
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत आयोजित संकल्प मेळाव्याला शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी हजेरी लावली.
या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नगरचे खासदार निलेश लंके यांनी ही भेट घडवून आणल्याचे बोलले जात आहे. पोखरकर यांच्या या उपस्थितीने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
रविवारी (दि. १५) मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड, खासदार निलेश लंके, मुंबई शहर अध्यक्षा राखीताई जाधव यांच्यासह ३६ तालुके आणि सहा जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख तथा खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांनी या व्यासपीठावर शरद पवार यांच्याशी संवाद साधला. राखीताई जाधव यांनी पोखरकर यांचे व्यासपीठावर स्वागत केले.
नजीकच्या कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका होणार आहेत. काही वर्ष रखडलेल्या निवडणुकीची कार्यकर्ते वाट पाहून आहेत. अशा पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी, पोखरकर यांनी याला राजकीय रंग देण्यास नकार दिला. मात्र, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी शरद पवार यांच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. ही भेट केवळ औपचारिक होती की त्यामागे काही राजकीय हेतू आहे? याबाबत आता राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.
– भगवान पोखरकर, जिल्हाध्यक्ष, शिवसेना पुणे राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या ठिकाणी दुसऱ्या हॉलमध्ये भावाच्या मुलीचा साखरपुडा कार्यक्रम होता. ये-जा करताना आग्रह झाला म्हणून मी व्यासपीठावर गेलो. याला राजकीय अर्थ काढण्यात काही तथ्य नाही.
–