
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनीधी – आलोक आगे
वाघोली :
पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारन, देखभाल दुरुस्ती विभागामध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. कार्यकाळ संपलेला असताना पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कोणाच्या राजकीय आशीर्वादामुळे हे अधिकारी मागील दहा-बारा वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत याचे गौडबंगाल काय? याची चौकशी व्हावी अशी मागणी आयुक्तांकडे स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव यांनी केली आहे.
आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे की, अधिकारी विनायक शिंदे हे सन २०१६ पासून मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती या विभागांमध्ये उप अभियंता या पदावर कार्यरत आहेत. एक-दोन महिन्यासाठी विनायक शिंदे यांची बदली ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयात झालेली होती अन्यथा मागील दहा वर्षापासून शिंदे हे मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातच कार्यरत आहेत. दहा वर्ष अधिक काळ मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागात काम करूनही त्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र नुकतीच महापालिका सामान्य प्रशासन विभागाने बदलीसाठी पात्र असलेल्या उप अभियंता यांच्या यादीमध्ये विनायक शिंदे, पुरम यांचे नाव नाही याबद्दल संपूर्ण पुणे महापालिकेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
गणेश पुरम मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. ते त्याच ठिकाणी बढतीने शाखा अभियंता, उप अभियंता पदापर्यंत बढती मिळूनही मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातच कार्यरत आहेत.
शहरातील बहूतांश रस्त्यांना थोडा जरी पाऊस झाला तरी नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र टीव्ही, प्रिंट मिडियाद्वारे पहात व वाचत असतो. या सर्व परिस्थितीस ठाण मांडून बसलेले अधिकारी शिंदे व पुरम हे प्रामुख्याने कारणीभूत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
महानगरपालिकेच्या मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागाकडून मागील दहा वर्षांमध्ये ड्रेनेज विषयक पावसाळी लाईन, कल्व्हर्ट विषयक किंवा नाला विषयक जे मोठे मोठे प्रकल्प झालेले आहेत, त्या प्रकल्पावर उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता म्हणून विनायक शिंदे व गणेश पुरम यांनीच काम पाहिलेले आहे. म्हणजेच पुणे शहर वासियांना थोडा जरी पाऊस झाला तर रस्त्यांवर पाणी साठवून नद्यांचे स्वरूप येते. नागरिकांना नाहक त्रास होतोय त्यास देखील हे अधिकारी जबाबदार आहेत. दोघेही मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून व राजकीय वरदहस्त वापर करून मागील दहा वर्षांपासून याच विभागामध्ये कार्यरत आहेत यांच्याकडे कोणाचे लक्ष कसे जात नाही? इतकी वर्षे होऊनही यांची बदली कशी होत नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागात इतके वर्षे का कार्यरत आहेत याची चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांचेकडे केली आहे.