
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातलं आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरवले आहेत. या घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे, असं म्हणता येणार नाही. ही स्थानिक प्रश्नांवरील निवडणूक आहे. याच्याशी संबंधित असलेले लोक त्यांच्या हिताबाबत योग्य तो निर्णय घेतील. या निवडणुकीबाबत आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष देखील इथे नाही,
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील उमेदवार उतरवले आहेत. “या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, आजही नाही. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा आणि एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्याने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांनी लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं मात्र हे आम्ही दीर्घकाळ राहणार नाही.हे या कारखान्या पुरतं मर्यादित होतं,” असं शरद पवार म्हणाले.
माळेगाव निवडणुकीमध्ये एकत्रित लढण्याबाबत चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचे बोलणं झालं होतं, त्यांना अडचण होती, त्यामुळे आम्ही ताणले नाही आणि आपले स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तसेच या निवडणुकीत मी जास्त लक्ष घालत नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, “आज पुण्यामध्ये एआय बाबत वर्कशॉप आहे. माझं लक्ष तिकडे आहे. वर्कशॉपसाठी विदेशातील लोक देखील येणार आहेत.एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असे मला वाटत. महाराष्ट्र सरकारने काल यासाठी 500 कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे,”
एआयचा वापर ऊस आणि बाकीचे पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी करण्याचा निर्णय फायनल करण्यात आला आहे. याचा फायदा शेतीला होत असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतला असेल. शेतीसाठी एआय वापराबाबत निर्णय घेणार देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे. त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले.