
गुजरात पॅटर्नपुढे झुकणार नाही म्हणत वर्धापनदिनीच राज ठाकरेंना साद तर शिंदेंवर घणाघात…
शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातू मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची साद घातली आहे.
शिवाय ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेइमानांचे धाबे दणाणले आहेत, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवाय शिवसेना गुजरात पॅटर्नसमोर कधीही झुकणार नाही, असंही सामनात म्हटलं आहे.
सामनामध्ये लिहिलं की, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना 59 वर्षांची झाली. उद्या ती साठ, सत्तर, पंचाहत्तर वर्षांची आणि एक दिवस शंभरी पार करून पुढे जाईल. शिवसेनेचा हा प्रवास नेहमीच खडतर आणि संघर्षाचा राहिला पण लढण्याचे प्रसंग जेव्हा जेव्हा आले, तेव्हा तेव्हा लढणारे शिवसेनेसोबत राहिले आणि रडणारे पळून गेले.
शिवसेना आजही त्याच पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून बसलेल्या अवलादी आजही आहेत. आपलेच मराठी बांधव खास करून त्यात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करून मुंबई-महाराष्ट्राचा घास गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याच्या विचारात आहेत. त्यांनी मुंबईचा सौदा करूनही टाकला, पण जोपर्यंत स्वाभिमानी शिवसेना येथे ठामपणे उभी आहे, तोपर्यंत मुंबईचा तुकडा यांच्या बापजाद्यांना पाडता येणार नाही.
शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनी आमचे मराठी जनतेला हे वचन आहे, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आज महाराष्ट्राची आणि देशाची चिंता तशी कुणालाच नाही. व्यापारी सत्तेच्या खुर्च्यांवर बसले की, दुसरे काय होणार? सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी आता मुंबई-महाराष्ट्रच नव्हे, तर देश लुटत आहेत. देशभरात पूल कोसळत आहेत, एअर इंडियाची विमाने पडत आहेत.
कश्मीर खोऱ्यांत दहशतवादी स्वस्थ बसलेले नाहीत. पहलगाम हल्ल्यात आमच्या 26 मायभगिनींचे कुंकू पुसले. त्यांचा आक्रोश थांबलेला नाही. अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या चिता विझल्या नाहीत आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले. आतापर्यंत मोदींनी 200 विदेश दौरे केले असतील. आपल्या दौऱ्यासाठी 20 हजार कोटींचे विशेष ‘आरामदायक’ विमान खरेदी केले.
यातून देशाला काय मिळाले? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान, याचवेळी मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर देखील सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे.
शिवाय उद्धव ठाकरेंनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेइमानांचे धाबे दणाणले आहेत. ही अशा पद्धतीने ‘मराठी एकजूट’ झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल या भीतीने अनेकांची गाळण उडाली. ‘एसंशिं’ गटापासून भाजपच्या व्यापार मंडळापर्यंत प्रत्येक जण देव पाण्यात घालून बसला आहे, असा थेट आरोप देखील सामनातून शिंदे आणि भाजपवर करण्यात आला आहे.
तर लोकांमध्ये संभ्रम, संशय निर्माण करून मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे. शिवसेना शतायुषी होईल. त्यापुढे जाईल.
जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे. पण एक मात्र नक्की, शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही. बोला, हर हर महादेव, असं म्हणत शिवसेना वर्धापनदिनाचं ओचित्य साधत सामातून ठाकरे गटाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.