छत्रपती संभाजीनगर : सरकार राज्याचे असो वा केंद्राचे… जनतेच्या मुद्द्यांवर सरकारला घाम फोडून आपल्याला आपला दरारा कायम ठेवायचा आहे. आपल्याकडे अनेक पराक्रम करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा एक आदर्श कर्णधार आहे.
त्यांचा दरारा उभ्या जगाने पाहिला आहे. आपण त्यांचे बछडे आहोत, आपल्याला कोणाचे कसले भय? आपल्या मुळावर उठणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब आपल्यालाच करावा लागणार आहे. अगदी आपल्यातून गेलेल्या कृतघ्न लोकांचाही, असा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज, गुरुवारी 59वा वर्धापन दिन आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले असले तरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या पक्षावरील दावा कायम आहे. त्यामुळे आज, गुरुवारी दोन्ही पक्षांचे वर्धापनदिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांसाठी खुले पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी आमिषाचे अक्षरशः बाजार भरवले जात आहेत. आपण छातीठोकपणे सांगू शकतो की, होय.. बाळासाहेब ठाकरे आमच्या संघटनेचा बाप आहे. गद्दार गटाने हे हे शब्द उच्चारले तर दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डोळे वटारतात. चतकोरीच्या बदल्यात खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या या गद्दारांना सूर्याजी पिसाळ म्हणावे, खंडोजी खोपडे म्हणावे की अजून काही, हे काळ ठरवेल…, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
आपली बांधिलकी जनतेशी आणि ‘मातोश्री’शी आहे. तेच मातोश्री ज्यात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा जिगर आहे. आज शेतकरी, सामान्य माणूस, महिला आणि अगदी लहान लेकरांचे भविष्य या सरकारने अधांतरी लटकवून ठेवले आहे. भोवताली हजार प्रश्न आहेत ज्यांच्यावर आपल्याला लढण्याचे बळ मिळत राहील. हे प्रश्न हाती घेऊ, आंदोलनांचे रान उठवू आणि लोकांचे प्रश्न धसास लावू. सत्ताधारी शिवसेनेपुढे नाही झुकणार तर कोणापुढे झुकणार? असे सांगत त्यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले आहे.
