
अमित शहा असे का म्हणाले ?
भारतीय भाषा ही देशाची खरी ओळख आहे. त्यामुळे आपल्याला आपला भाषिक वारसा पुन्हा स्थापित करावा लागेल. भारतात लवकरच इंग्रजी बोलण्याची स्वतःला लाज वाटेल, तो काळ दूर नाही, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि.१९) येथे केले.
त्यामुळे आणखी एक नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शहा पुढे म्हणाले की, लक्षपूर्वक ऐका, मी काय म्हणतोय ते लक्षात ठेवा, आपल्याला असा समाज बनण्यास फार काळ लागणार नाही. जिथे इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना लाज वाटेल. आपल्या भाषा आपल्या संस्कृतीचे अलंकार आहेत. त्याशिवाय आपण भारतीय राहू शकत नाही. भारताला परदेशी भाषेत समजता येत नाही. इंग्रजी आता वसाहतवादी गुलामगिरीचे प्रतीक बनली आहे. जगभरात त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लवकरच इंग्रजी ही एक अप्राकृतिक भाषा मानली जाईल, जी भारतीय विचार आणि आत्म्याशी जुळत नाही. स्वावलंबन आणि नेतृत्वाचे साधन म्हणून भाषांकडे पाहिले पाहिजे.
आपल्याला आपल्या भाषांचा अभिमान असला पाहिजे. आपण या भाषांमध्ये संशोधन करू, निर्णय घेऊ, देश चालवू आणि जगाचे नेतृत्व देखील करू. २०४७ पर्यंत भारताला सर्वोच्च स्थानी नेण्यात या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील. देशाच्या प्रशासकीय प्रशिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. ब्रिटिश राजवटीच्या विचारसरणीतून उदयास आलेल्या या व्यवस्थेत संवेदनशीलतेचा अभाव आहे. जर कोणताही प्रशासक करुणा आणि समजूतदारपणाशिवाय राज्य करत असेल. तर तो जनतेशी जोडू शकत नाही. प्रशासकीय सेवा आता भारतीय दृष्टिकोन आणि संवेदनशीलतेने ओतप्रोत झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.