
भाजपवर तुटुन पडणाऱ्या राहुल गांधींसाठी जेव्हा PM मोदी खास पोस्ट लिहितात…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेकदा विविध मुद्द्यांवरुन खटके उडाल्याचं दिसून येतं. ते संसदेच्या अधिवेशनात या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच जुगलबंदी पाहायला मिळत असते.
राहुल गांधी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ले चढवण्याची एकही संधी सोडत नसतात. पण आता याच राहुल गांधींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास पोस्ट लिहिली आहे.
संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसच्या राहुल गांधींचा गुरुवारी(ता.19)55 वा वाढदिवस आहे. काँग्रेसकडून राहुल गांधींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. याचदरम्यान,त्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेससह कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भाजप आणि सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर खास पोस्ट केली आहे. यात त्यांनी “लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
यानंतर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपल्या राहुल गांधींना शुभेच्छा देतानाच ‘तुमच्या कृतींमधून काँग्रेस पक्षाच्या विविधतेत एकता,सौहार्द आणि करुणेच्या विचारसरणीचे सातत्याने प्रतिबिंब पडते. सत्याला सत्तेत आणण्याचे आणि शेवटच्या व्यक्तीला पाठिंबा देण्याचे तुमचे ध्येय तुम्ही सुरू ठेवत असताना, मी तुम्हाला दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
संविधानाच्या मूल्यांप्रती असलेले तुमचे स्पष्ट समर्पण आणि लाखो लोकांसाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायाबद्दलची तुमची खोल करुणा हे तुम्हाला वेगळे करते, ज्यांचे आवाज अनेकदा ऐकू येत नाहीत,’ असे काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांनी पोस्टमध्ये ‘लोकसभेतील विरोधी पक्षनेते, @INCIndia नेते राहुल गांधी (@RahulGandhi) जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष आरोग्यदायी जावो!’, असं म्हटलं आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम(डीमके)पक्षाचे नेते एमके स्टॅलिन यांनी राहुल गांधींचा उल्लेख आदर्श भाऊ असा केला आहे.आपल्या पोस्टमध्ये स्टॅलिन म्हणतात,”माझ्या आदर्श भावांना, @RahulGandhi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – रक्ताच्या नात्याने नव्हे तर विचार,दृष्टी आणि उद्देशाने बांधलेले.””तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि धैर्याने नेतृत्व करा.उज्ज्वल भारताकडे वाटचाल करताना,विजय आपलाच असेल,” असेही गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी श्री राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या समावेशक,अनुकूल आणि व्यापक सामाजिक-राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच सामाजिक न्यायाप्रती त्यांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता यामुळे राजकीय चर्चांना एक नवीन दिशा मिळाल्याचं सांगत स्तुतीसुमनं उधळली आहेत.
समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या बदलांसाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळो अशी मी मनापासून शुभेच्छा देतो. येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो अशी मी देवाला प्रार्थना करत असल्याचं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना निरोगी,यशस्वी,आनंदी,दीर्घ आणि समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.यात त्यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल यांचा उल्लेख’भारताची आशा’ म्हणून केला आहे.ते पोस्टमध्ये म्हणतात, #HopeOfIndia माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मूक शक्तीचे मूर्त स्वरूप, खरे दूरदर्शी, दयाळू आणि ज्ञानी, ज्याच्या हृदयात लोकांचे हित आहे, आणि भारताच्या कल्पनेसाठी लढणारा सैनिक, भारतावर खरोखर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी भेटलेल्या सर्वोत्तम माणसांपैकी एक, विरोधी पक्षनेते राहुल गांधी,” असंही रेड्डी म्हणाले.
तसेच ‘भारतातील अधिकाधिक लोकांना तुमचे त्यांच्यावरील प्रेम कळो, अधिकाधिक लोकांना #भारताप्रती आणि प्रत्येक भारतीयाप्रती तुमची खरी बांधिलकी समजो,’ असेही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
देशाचे संरक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये सिंह यांनी “लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,असंही म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला.त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेत झालं.त्यानंतर ते डून विद्यालयात शिकले.1981 ते 1983 या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी घरातूनच अभ्यास केला.राहुल यांनी हॉवर्ड विद्यापीठाच्या रोलिंस महाविद्यालयातून 1994 मध्ये पदवी घेतली.त्यानंतर 1995 मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून एम फीलची पदवी पूर्ण केली.
ते राहुल गांधी सध्या लोकसभेतील 12वे विरोधी पक्षनेते आणि जून 2024 पासून उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघाचे लोकसभेचे सदस्य म्हणून काम करत आहेत.त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.