
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी होत्या. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
पुणे पोलिसांनी यंदा पालखी सोहळ्यातील गर्दी मोजण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यातही गर्दी मोजण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. त्याच धर्तीवर पुण्यात एआय कॅमेरे वापरुन प्रथमच गर्दी मोजण्यात आली. पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात तब्बल पाच लाख वारकरी येऊन गेल्याचे एआय कँमेऱ्याच्या माध्यमातून समोर आले.
कोणत्या पालखी सोहळ्यात किती गर्दी?
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये २० जून रोजी दाखल झाला. या पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत पुणेकरांबरोबर प्रशासनाकडून करण्यात आले. ठिकठिकाणी पालखी मार्गावर स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. पुणे पोलिसांकडून गर्दी मोजण्यासाठी एआयची व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यातील विश्रांतवाडी, संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट या प्रमुख ठिकाणी एआय कॅमेरे लावण्यात होते. त्या माध्यमातून पालखी सोहळ्यात किती वारकरी आले त्याची मोजणी करण्यात आली.
माऊलींच्या पालखीसोबत 2 लाख 95 हजार वारकरी आल्याची नोंद झाली. तर तुकोबांच्या पालखीसोबत 1 लाख 95 हजार वारकरी पुणे शहरात दाखल झाल्याचे एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समोर आले. पुणे पोलिसांनी वारीच्या गर्दीचे अचूक मोजमाप करण्यासाठी पहिल्यांदाच एआय कॅमेरा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
संत तुकाराम महाराजांची पालखी यवतच्या मार्गावर
संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकारामांची पालखी दिवे घाट पार करुन पंढरपूरकडे निघाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी रविवारी रात्री लोणी काळभोरमध्ये मुक्कामी होती. सोमवारी सकाळी लोणी काळभोरमधून पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली. लोणी काळभोरमध्ये हवेली तालुक्यातील जनतेने मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले.