
स्टोक्सच्या सापळ्यात पुन्हा अडकला साई सुदर्शन अन् स्वत:चं गिफ्ट केली विकेट…
भारताने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात इंग्लंडला ऑल आऊट करत अवघ्या ६ धावांची आघाडी मिळवली. जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत भारताला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि इंग्लंडला ४६५ धावांवर सर्वबाद केलं.
भारतीय संघ ६ धावांच्या आघाडीसह फलंदाजीला उतरला आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ९० धावा केल्या. भारताने ९६ धावांची आघाडी रचताना दोन विकेट्स गमवावे लागले. दरम्यान स्टोक्सने साई सुदर्शनला सापळा रचून बाद करत विकेट मिळवून दिली.
साई सुदर्शनला पहिल्या डावात देखील बेन स्टोक्सने सापळा रचत झेलबाद केलं होतं. साई सुदर्शनचा हा पहिलाच कसोटी पदार्पणाचा सामना आहे. पण पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच डावात साई शून्यावर बाद झाला. स्टोक्सने लेग स्लिपबरोबर गलीमध्येही फिल्डर उभा केला. त्याने सुदर्शनच्या पायात चेंडू टाकला आणि चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक जेमी स्मिथने त्याचा झेल टिपत त्याला झेलबाद केलं होतं.
पहिल्या डावानुसार दुसऱ्या डावातही बेन स्टोक्सने साईला पहिल्या डावात जसं बाद केलं होतं. तसंच बाद करण्याचा प्रयत्न करत होता. पण साई सावधानीने खेळ होता. साईने स्टोक्सच्या षटकातील चेंडू सावधपणे खेळले होते. याशिवाय त्याने ४८ चेंडूत ३१ धावा केल्याने तो बऱ्यापैकी सेट झाला होता.
स्टोक्सने साई सुदर्शनला बाद करण्यासाठी कसं केलं होतं प्लॅनिंग?
स्टोक्स २१व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने साईसाठी फिल्ड सेट केली. सुरूवातीला स्टोक्सने लेगस्लिपला फिल्डर ठेवला नव्हता. दोन चेंडू झाल्यानंतर स्टोक्सने फिल्ड बदलली. त्यानंतर पुढच्या २ चेंडूवर १ चौकार आणि २ धावा करत साईने धावा केल्या. स्टोक्सने मिड विकेटलाही अगदी बरोबर फिल्डर सेट केला होता. पाचवा चेंडू स्टोक्सने पुन्हा पायात टाकला.
स्टोक्सने पॅडवर टाकलेल्या चौथ्या चेंडूवर साईने चौकार मारला होता. स्टोक्सने पुन्हा पुढचा चेंडू पायात टाकला. साईने स्टोक्सचा इनस्विंगर फ्लिक केला आणि चेंडू हवेत राहिला आणि मिड विकेटवर असलेल्या क्रॉलीने कोणतीही चूक न करता तो झेल टिपला आणि साई पु्न्हा एकदा माघारी परतला. ज्या चेंडूवर साईने चौकार मारला होता, तसाच चेंडू स्टोक्सने टाकला आणि साईने फ्लिक केला, पण विकेट गमावून बसला.
बेन स्टोक्सने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लंडला दुसरी विकेट मिळवून दिली. राहुल आणि साईच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुढे नेत होते. पण बेन स्टोक्सच्या प्लॅनिंगपुढे साईला काही करता आलं नाही आणि तो बाद होऊन माघारी परतला.