
भास्कर जाधवांनी बाॅम्बच टाकला; ठाकरेंवरील नाराजीवर थेट बोलले !
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भास्कर जाधव नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. राऊत यांच्यावर बोलत असतानाच जाधव यांनी शरद पवारांना सोडून राजकीय चूक केल्याचे म्हटले.
त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात त्यांची घुसमट होत असल्याची चर्चा आहे. त्यावर जाधव यांनीच स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले,’मी घुसमटून जाणार नाही माणूस नाही. मी पवारसाहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, हे मी नाकारणार नाही. राजकीय चूक झाली हे मी कबूल केलं. त्यात तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रमाणिकपणा दिसला पाहिजे. माझी कुणीही घुसमट केली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चारही बाजुने घेरले जातय. तेव्हा माझं मन सांगतंय की मी जोरदारपणे आक्रमण केले पाहिजे..
शरद पवारसाहेबांना सोडलं ही मी राजकीय चूक केली, हे बोललो म्हणजे शिवसेनेत घुसमट असा त्याचा अर्थ काढण्याचे काही कारण नाही. राजकारणात आजही इतका प्रामाणिकपणा जिवंत आहे, असं माझ्याकडे पाहिलं पाहिजे. प्रामाणिकपणे मी हे बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे.’, असे देखील जाधव म्हणाले.
नाराज नाही…
भास्कर जाधव म्हणाले, मी राजकीट निवृत्तीविषयी बोललो. मला थांबावसं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत झालं. माझी कोणावर नाराजी, कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं, असं नाही. माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. संघर्षाची तयारी आहे. 2022 पासून ज्या काही घटना पक्षात घडल्या. मला असं वाटतंय प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत का? मी आहेत त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे.
निवडणुकीची जबाबदारी
जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घेण्याचा निर्णय घेतोय. माझ्या सहकाऱ्यांना ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे. उतरणार आहे म्हणजे असा तसा नाही तर पक्षाला यश मिळून देण्यासाठी उतरणार आहे, असे देखील भास्कर जाधव यांनी जाहीर केले.