
रियायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सहकारी राहिलेले प्रकाश शाह यांनी संन्यास घेतला आहे. रिलायन्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट हे पद त्यांनी सांभाळले होते. निवृत्तीच्या वेळी प्रकाश शाह यांचा पगार ७५ कोटी रुपये होता.
परंतु सांसारिक जीवनाचा त्याग करुन त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. प्रकाश शाह यांना मुकेश अंबानी यांचा राइट हँड म्हटले जात होते.
प्रकाश शाह यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली. प्रकाश शाह आणि त्यांची पत्नी नैना शाह यांनी महावीर जयंतीच्या दिवशी दीक्षा ग्रहण केली. काही काळापूर्वीच ते दीक्षा घेणार होते. परंतु कोरोना महामारीमुळे त्यांनी हा निर्णय स्थगित केला होता. दीक्षा ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती सामान्य जीवन जगतात आणि मोक्ष मिळवण्यासाठी चांगले कर्म करतात.
आयआयटीचे पदवीधर
प्रकाश शाह यांनी आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजीनियरिंगमध्ये पदवी घेतली. त्यांच्या पत्नी नैना शाह या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एका मुलाने काही वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे लग्न झाले आहे. त्यांना एक मुलगा आहे.
रियायन्समध्ये अनेक जबाबदाऱ्या
रिलायन्स कंपनीत काम करताना प्रकाश शाह यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प सांभाळले. त्यांनी जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्ट आणि पेटकोक मार्केटिंगसारख्या मोठ्या प्रकल्पावर काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकाश शाह यांनी निवृत्ती घेतली, तेव्हा त्यांना ७५ कोटी रुपये पगार होता.
दीक्षा एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. प्रकाश शाह यांनी दीक्षा घेत आत्मिक शांती आणि मोक्षाचा मार्ग निवडला आहे. दीक्षा घेतल्यानंतर सर्व भौतिक वस्तूंचा त्याग केला जातो. एक साधू म्हणून पायात चप्पल न घालता पायीच प्रवास करावा लागतो. पांढरे कपडेच वापरावे लागतात. भिक्षेवर आपले जीवन चालवावे लागते. प्रकाश शाह यांना करियरमध्ये प्रचंड यश मिळाले. त्यानंतर आत्मिक शांततेसाठी जीवनात वेगळ्या मार्गाने जावे लागते, हे त्यांनी दाखवून दिले.