
गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 393.80 अंक आणि 1289.57 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 25112.4 अंक तसेच 82408.17 अंकांच्या पातळीवर बंद झाले.
टक्के वाढ सप्ताहभरात पहावयास मिळाली. सप्ताहाच्या मध्यापर्यंत दोन्ही निर्देशांक प्रामुख्याने नकारात्मक; परंतु मर्यादित किंमत पट्ट्यांमध्ये व्यवहार करत होते. परंतु, शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मात्र दोन्ही निर्देशांकांनी एक टक्क्यापेक्षा अधिकची उसळी घेतली. सर्वाधिक वाढ होणार्या कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (5.9 टक्के), ट्रेन्ट (5.5 टक्के), भारती एअरटेल (5.2 टक्के), आयशर मोटर्स (3.9 टक्के), भारत इलेक्ट्रॉनिक्स (3.6 टक्के) या समभागांचा समावेश झाला. त्याचप्रमाणे सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये टाटा मोटर्स (-5.0 टक्के), अदानी पोर्टस् (-4 टक्के), बजाज फायनान्स (-3 टक्के), डॉ. रेड्डीज (-2.7 टक्के), अदानी एन्टरप्राईझेस (-2.4 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. या सप्ताहात बाजारावर मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण या राष्ट्रांमध्ये भडकलेल्या युद्धज्वराचा परिणाम सुरुवातीला दिसून आला. परंतु, सप्ताहाअखेर सकारात्मक आशेवर शेवट झाला.
अंदमान निकोबार बेटाजवळ भारताला खनिज तेलाच्या साठ्याचा खजिना हाती लागला. भारताला या ठिकाणी सुमारे 1 लाख 84 हजार कोटी लिटर कच्च्या तेलाचे भांडार मिळाल्याचा दावा. यामुळे भारताची अर्थव्यवस्था तब्बल 5 पटींनी वाढून सध्याच्या 4 ट्रिलियन डॉलर्सवरून 20 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचण्याची शक्यता हरदीप सिंग पुरी (पेट्रोलियम मंत्री) यांनी वर्तवली आहे. सरकारी मालकीची कंपनी ‘ओएनजीसी’ने आर्थिक वर्ष 2024 मध्ये तब्बल 541 विहिरी खोदल्या. मागील 37 वर्षांतील ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. यापूर्वी गयाना या दक्षिण अमेरिकेतील एका लहानशा देशात अतिप्रचंड खनिजतेलाचा म्हणजेच 11.6 अब्ज बॅरलचा साठा सापडला होता. यामुळे तेल साठ्याच्या बाबतीत हा देश थेट 17 व्या स्थानी पोहोचला. अशाच प्रकारचा अतिप्रचंड साठा भारताला सापडल्याचे सूतोवाच पेट्रोलियम मंत्र्यांनी केले. दुर्दैवाने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याच देशात स्वतःच्या सरकारी कंपन्यांना खनिज तेलाच्या विहिरी खोदण्यावर अनेक निर्बंध होते.
परंतु, 2016 सालानंतर ही बंधने सैल केल्यावर झपाट्याने खनिज तेलाच्या विहिरी खोदून कच्चे तेल व नैसर्गिक वायू शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येते. आजदेखील भारत स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी 85 टक्के खनिज तेल आयात करतो. परंतु, या विहिरीतून उत्खनन सुरू झाल्यास भारताला डिझेल/पेट्रोलसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
* ‘एचडीएफसी’ची उपकंपनी ‘एचडीबी फायनान्शिअल्स’ लवकरच आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरणार. 25 जून रोजी या कंपनीचा 12500 कोटींचा आयपीओ खुला होणार असून, 27 जूनपर्यंत खुला राहणार आहे. याच दोन्ही एक्सचेंजवरील लिस्टींग 1 किंवा 2 जुलैच्या दरम्यान असेल. या आयपीओसाठी 2500 कोटींचे फ्रेश इश्श्यू शेअर्स व 10,000 कोटींचे ऑफर फॉर सेल (ओएफएस) शेअर्स जारी केले जाणार आहेत. ‘एचडीबी फायनान्शिअल्स’चा किंमतपट्टा 700 ते 740 दरम्यान ठेवण्यात आला आहे.
मे महिन्यात भारताची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत 2.7 टक्के घटून 38.73 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. निर्यातीप्रमाणेच आयातदेखील 1.73 टक्के घटून 60.61 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. आयात व निर्यात यामधील फरक दर्शवणारी व्यापार तूटदेखील यामुळे मागील महिन्यात असणार्या 26.4 अब्ज डॉलर्सवरून 21.8 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.
मेक माय ट्रिप कंपनी 2.6 अब्ज डॉलर्सचा निधी उभा करणार. इक्विटी समभाग आणि परिवर्तनीय रोखे (कन्व्हर्टीबल बाँडस्)च्या माध्यमातून निधी उभारला जाण्याची शक्यता. ‘ट्रिप डॉट कॉम’ या कंपनीचा भारतीय ‘मेक माय ट्रिप’मध्ये हिस्सा आहे. या चीनच्या कंपनीची मेक माय ट्रिपमधील हिस्सेदारी कमी करण्यासाठी भारतीय कंपनीने निधी उभारणीचा निर्णय घेतला. सध्या ट्रिप डॉट कॉम या चिनी कंपनीचा मेक माय ट्रिपमध्ये 45.34 टक्के हिस्सा आहे. या व्यवहारापश्चात हा हिस्सा 20 टक्क्यांच्या खाली जाईल.
विशाल मेगा मार्ट’च्या प्रवर्तकांनी 900 दशलक्ष समभागांची विक्री करून स्वतःच्या कंपनीतील 20 टक्के हिस्सा ब्लॉक डीलद्वारे बाजारात विकून टाकला. 113.5 रुपये प्रतिसमभाग दरावर एकूण 10,220 कोटींच्या हिश्श्याची विक्री करण्यात आली. प्रामुख्याने एचडीएफसी म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड यांनी हिस्सा खरेदी केला. सर्वांनी मिळून एकूण 7 टक्के हिस्सा खरेदी केल्याचा अंदाज आहे.
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट’नी ‘एचडीएफसी बँके’चे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांच्या विरोधात 1 हजार कोटींचा मानहानी दावा दाखल केला. मुंबईमधील प्रतिष्ठित लीलावती हॉस्पिटल या ट्रस्टकडून चालवले जाते. या ट्रस्टच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याचा आरोप करण्यात आला. काही काळापासून लीलावती ट्रस्ट आणि एचडीएफसी बँक यांच्यात एका इतर व्यवहारावरून वाद आहे. लीलावती ट्रस्ट हा एचडीएफसी बँकेचा कधीही कर्जदार (बॉरोवर) नव्हता. उलट ट्रस्टने 48 कोटी बँकेत रोखे आणि ठेवीस्वरूपात ठेवले होते. असा ट्रस्टचा दावा आहे. परंतु या ट्रस्टच्या ट्रस्टींशी संबंधित ‘स्पेंडर जेम्स लिमिटेड’ नावाच्या कंपनीचे कर्ज थकल्याने बँकेने केलेल्या कारवाईचा वचपा काढण्याच्या हेतूने उलट बँकेवरच मानहानीचा दावा ठोकल्याचा आरोप बँकेकडून करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले आहेत.
आरोग्य सेवा व तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘मेडट्रॉनिक’ कंपनी पुण्यात नवीन केंद्र सुरू करणार. हे मधुमेही रुग्णांच्या उपचारांसाठीचे केंद्र असणार असून, यासाठी पुढील पाच वर्षांत एकूण 400 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
‘झी एन्टरटेन्मेंट’च्या प्रवर्तकांनी स्वतःचा 4 टक्क्यांवरील हिस्सा 18.39 टक्क्यांवर नेण्याचे जाहीर केले. एकूण 2,237 कोटींची गुंतवणूक यासाठी करण्यात येणार आहे. 169.5 दशलक्ष पूर्णतः परिवर्तनीय (फुल्ली कन्व्हर्टिबल) डिबेंचर्स स्वरूपात गुंतवणूक होणार. पुढील काही काळात हा हिस्सा 26 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे प्रवर्तकांचे उद्दिष्टआहे.
20 जून अखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.294 अब्ज डॉलर्सनी वधारून 698.95 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.