
मनसैनिक शिवसेना ठाकरे पक्षाच्या टाळीच्या भरोशावर थांबेना !
ठाकरे बंधूंच्या युतीच्या टाळ्या कधी होतील, तेव्हा होतील. या दोघा बंधूच्या युतीच्या टाळ्या अनेकदा हुकल्या आहेत. पण निवडणुकीत संधी हुकायला नको म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने कार्यक्षेत्रात कार्यरत झाले आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाने एकप्रकारे स्वबळाचा नारा दिल्याचे चित्र दिसत असल्याने मनसेने देखील मुंबईत आपल्या दारी उपक्रम हाती घेतला आहे. मनसेने हा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे निष्ठावान आमदार अजय चौधरी यांच्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून सुरू केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवडी मतदारसंघात शिवसेना ठाकरे सेना पक्ष आणि मनसे (MNS) यात सामना रंगला होता. शिवसेना ठाकरेंचे निष्ठावान अजय चौधरी आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत झाली होती. महायुतीने बाळा नांदगावकरांना जाहीर पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंचा हा पारंपारिक मतदारसंघा हिसकावून घेण्यासाठी महायुतीने अथक प्रयत्न केले. पण त्यात यश आलं नाही.
विधानसभा निवडणुकीत शिवडी मतदारसंघात एकप्रकारे ठाकरेंविरुद्ध ठाकरे, असा सामना झाला होता. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने मुंबई (Mumbai) महापालिका काबिज करण्यासाठी रणनीती आखली आहे. तर शिवसेना ठाकरे सेना पक्षाला मुंबई कोणत्याही परिस्थिती ताब्यात ठेवायची आहे. यातच शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना जोर चढला आहे. ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देण्याची भाषा करत आहेत. परंतु ही टाळी कधी वाजणार, यासंदर्भात संभ्रम आहे.
शिवसेना ठाकरे सेना पक्षा वर्धापनदिनानंतर उद्धव ठाकरेंना खासदार, आमदार, नेते, उपनेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. एकप्रकारे स्वबळाची तयारी केली आहे. त्यामुळे मनसे देखील शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या बालेकिल्ला असलेल्या शिवडीतून मनसे आपल्या दारी उपक्रम हाती घेतला आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या उपक्रमातून मनसे थेट मतदारांच्या घरांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
लोकांमध्ये जाण्याची तयारी
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले, “मुंबईकरांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न मनसे करीत आहे. लोकांची वाट न बघता मनसैनिक थेट लोकांमध्ये जाऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे. याची सुरुवात शिवडी मतदारसंघातून केली जात आहे”.
लोक समस्यांवर लक्ष केंद्रीत
मनसेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष नीलेश इंदप यांनी प्रत्येक विधानसभेतील प्रभागनिहाय पथके तयार केली जातील. त्यांच्या माध्यमातून लोकांशी बोलून त्यांची मते जाणून घेतली जातील. महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, महावितरण इत्यादी मुंबईला सेवा पुरवणाऱ्या संस्थांबाबत लोकांच्या समस्या समजून गेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.’
हिंदी भाषा मुद्दा तापणार
मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील तीन ते चार महिन्यांत अपेक्षित आहे. त्यादृष्टीने मनसे आता सक्रिय झाली आहे. हिंदीला विरोध, मराठीचा मुद्दा यासोबतच आता थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न मनसे करीत आहे. यातून मनसे निवडणुकीच्या तयारीला लागली असून, आपला जनाधार मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.