
प्रकाश महाजन मनातलं सगळं बोलून गेले !
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांनी सर्वप्रथम, ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमीलन सुरु झाले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली होती.
गेल्या काही दिवासांपासून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर भाष्य केलं आहे. युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना) माफ करणार नाही, असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त केलं. तसेच युती न झाल्यास भाजप दोघांनाही संपवेल का?, असा प्रश्न विचारल्यास, असं होऊ शकतं, असंही प्रकाश महाजन म्हणाले.
प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?
युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही. गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर बोलणं सुरु आहे. त्यामुळे मराठी माणूस व्यथित झाला आहे, असंही प्रकाश महाजन यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध एखादी शक्ती उभी राहत असेल तर तर ती दोघांनाही संपवेल, असं होऊ शकतं, असं प्रकाश महाजन यांनी सांगितले. मनसे-सेनेची युती न झाल्यास मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही. त्यांची एक चूक मराठी माणसाला 100 वर्षे मागे टाकेल. तसेच याची नोंद इतिहास काळ्या अक्षरात घेतली जाईल आणि शत्रूला तेच हवंय, असं प्रकाश महाजन म्हणाले. याआधी जेव्हा शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा होती, तेव्हा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर दोनवेळा मातोश्रीवर गेले होते. बाळा नांदगावकर जाणं म्हणजे राज ठाकरे जाणं आहे. राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर एका नाणेच्या दोन बाजू आहेत. गेल्या काही कोणी व्यक्ती राज ठाकरेंकडे आली का?, असा सवालही प्रकाश महाजनांनी उपस्थित केला.
दोन्ही बाजूकडील सगळ्यांनी शांत राहिले पाहिजे- प्रकाश महाजन
मराठीत एक म्हण आहे, महादेव देवळात आणि पाणी घालता वेशीवर…उपयोग काय, महादेवांच्या पिंडीवर जाऊन पाणी घाला…संजय राऊत तुम्ही मोठे नेते आहात, पण युतीबाबत तुम्ही बाहेरुणचं बोलताय, असं प्रकाश महाजन म्हणाले. मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होईल, नाही होईल…या विषय भविष्याच्या गर्भात आहे. दोन्ही बाजूकडील सगळ्यांनी शांत राहिले पाहिजे आणि योग्य त्या व्यक्तीने, योग्या त्या व्यक्तीसोबत आणि योग्य त्या पद्धतीने संवाद साधला पाहिजे, असा सल्लाही प्रकाश महाजन यांनी दिला.