
पवारांनी निवडणूक का लढवली; तेही सांगितले…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकाला पहिलाच निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलच्या बाजूने लागला आहे. खुद्द अजितदादा पवार हे ब वर्ग गटातून तब्बल ८१ मते अधिक घेऊन विजयी झाले आहेत.
अजितदादांच्या विजयानंतर माळेगाव कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांनी मोठा दावा केला आहे. आता तो खरा होता का, हे पाहावे लागणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी (Malegaon Sugar factory) रविवारी (ता. २२ जून) चुरशीने ८८ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी बारामतीत सुरू आहे. त्यात ब गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय घोषित करण्यात आले आहे. तसेच, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातूनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या पॅनेलचे रतनकुमार भोसले यांनी आघाडी घेतली आहे. पण पवारांच्या विजयानंतर समर्थकांचा उत्साह दुणावला असून त्यातूनच केशवराव जगताप मोठ्या विजयाचा दावा केला आहे.
केशवराव जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयाने पहिला निकाल नीलकंठेश्वर पॅनेलच्या बाजूने लागला आहे. विजयाबद्दल अजितदादांचे मी अभिनंदन करतो. इथून पुढचे निकालसुद्धा असेच आमच्या बाजूने लागतील. अजित पवारांचे नेतृत्व, कर्तृत्व, शेतकऱ्यांच्या प्रती असलेली कळवळ आणि कणव आहे. शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन एआयच्या माध्यमातून वाढावे, यासाठी त्यांनी लक्ष केंद्रीत केलेले आहे.
महाराष्ट्र सरकार नऊ हजार, व्हीएसआय आठ हजार आणि उर्वरीत शेतकरी अन कारखाना खर्च करणार आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील इतका मोठा बोजा अजित पवारांनी कमी केला आहे. शेतकऱ्यांना एवढा मोठा खर्च परवडणार नाही. त्यांचे उसाचे उत्पादन वाढणार नाही, त्यामुळे त्यांना मदत केली पाहिजे, या भूमिकेतून उपमुख्यमंत्र्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. गरजू लोकांना मदत करण्याचा अजित पवारांचा स्वभाव आहे, असा दावा चेअरमन केशवराव जगताप यांनी केला आहे.
ते म्हणाले, अजित पवार हे ब वर्ग मतदारसंघाचे मतदार आहेत, तीन संस्थांनी त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आहे. राज्यघटनेच्या अधिकारानुसार ज्या मतदारसंघात तुमचे नाव आहे, त्या मतदारसंघात तुम्हाला उभं राहता येतं आणि जादा मते घेणारा निवडून येतो.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होण्याचे अजितदादांचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होणार आहे. माळेगाव कारखान्याचे सगळे निकाल आमच्या बाजूनेच लागणार आहेत. हळूहळू निकाल येतील. ट्रेंड लगेच कळतील. माळेगाव साखर कारखान्याचा निकाल शंभर टक्के २१-० असा होणार आहे, असा विश्वास कारखान्याचे विद्यमान चेअरमन जगताप यांनी केला आहे.