
बड्या नेत्यांना ‘वाळीत’ टाकलं; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एकीकडे शिंदे गटाच्या प्रचंड नाराजीचा सामना करावा लागत असताना आता त्यांच्या स्वत:च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत
पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही दोन शहरं अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी संख्या असल्याने येथील राजकारणावर कायमच अजित पवार यांची पकड राहिली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील अनेक बडे नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदारांचा समावेश आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार, जुन्नरचे अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे पक्षात प्रचंड नाराज आहेत. पक्षातील कोणत्याच बैठकीत आपल्याला बोलवले जात नाही. तसेच कोणतीच जबाबदारी पक्षातून दिली जात नाही, अशी खंत या माजी आमदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पक्षात नवीन येणाऱ्या लोकांचा मानसन्मान केला जातो, पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का? असा सवाल या आमदारांकडून खासगीत उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय?
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार पराभूत झाले होते, त्यांच्यासाठी सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून पायघड्या घातल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. यामध्ये माजी आमदार आणि विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. एकीकडे तुम्ही दुसऱ्या पक्षातील माजी आमदारांना घेता, परंतु आपल्याच पक्षाच्या पराभूत झालेल्या आणि पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता, असा सवाल राष्ट्रवादीतील नाराजांच्या गटाकडून उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला अजितदादांसोबत जाणाऱ्यांमध्ये या सगळ्यांचा समावेश होता. त्यामुळे आम्ही निष्ठावंत राहूनही आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे? अजित पवारांच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकांना का बोलावले जात नाही?, असे प्रश्न या आमदारांनी उपस्थित केले आहेत.