
निवडणूक आयोगाला कानठळ्या बसतील; असा आवाज झालाय…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राहुल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले की त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात.
त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर असतात. आता राहुल गांधी यांनी फडणवीस यांच्या मतदारसंघातच मतदारयादीत फेरफार, अफरातफरी केल्याचा आरोप करून थेट मुळावर घाव घातला आहे. राहुल यांनी ‘न्यूजलॉंड्री’ने केलेल्या संशोधानात्मक वार्तांकनाचा यासाठी आधार घेतला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या. हे यश पाहता विधानसभा निवडणुकीत म्हाविकास आघाडीला बहुमत मिळणार, असे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले. महाविकास आघाडीच्या पदरी अपयश पडले. त्यावेळेसपासून ईव्हीएम, निवडणूक आयोगावर आरोप केले जात आहेत. निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजपने विधानसभा निवडणुकीत कशी अफरातफर केली आणि निवडणूक आय़ोगाने भाजपला पूरक भूमिका कशी घेतली, याबाबत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकात सविस्तर लेख लिहिला होता. आता त्यांनी थेट फडणवीस यांच्या मतदारसंघावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी ‘न्यूजलॉंड्री’च्या लेखाच्या आधारावर हा आरोप केला आहे, त्यानुसार, लोकसभा आणि त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात 29,219 मतदार वाढले आहेत.
सहा महिन्यांत फडणवीस यांच्या मतदारसंघात दररोज 162 मतदारांची वाढ झाली आहे. यापैकी हजारो मतदारांचा या मतदारसंघात पत्ता सापडलेला नाही, म्हणजे या मतदारांचे घर आढळून आलेले नाही. मतदारसंघातील 50 बूथवरील किमान 4000 मतदारांचा पत्ता सापडला नाही, असाही दावा या लेखात केलेला आहे. मतदारांच्या संख्येत झालेली ही वाढ 8.25 टक्के आहे. याशिवाय या मतदारसंघातील 2301 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. एकूण मतदारांची संख्या पाहिल्यास ही टक्केवारी 0.6 इतकी आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून सलग चारवेळेला निवडणूक जिंकली आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा 39,710 मतांनी पराभव केला. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत भाजपची 14,225 मते वाढली. काँग्रेसच्या मतांमध्ये केवळ 8000 ची वाढ झाली. यावरून निवडणूक आयोगवार विरोधक प्रश्नांचा भडीमार करत आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर अन्य काही राज्यांच्या निवडणुकांबाबतही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मतदारांच्या संख्येत चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आणि दोन टक्क्यांपेक्षा अधित मतदारांना वगळले तर त्याची पडताळणी निवडणूक आयोगातर्फे केली जाते. याबाबत निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 4 टक्के आणि 2 टक्के ही मर्यादा आहे. मतदारांना वगळणे ही संवेदनशील बाब आहे, त्यामुळे ही मर्यादा 2 टक्क्यांपेक्षाही कमी ठेवली जाते. मतदारांची संख्या वाढणे कधीही चांगलेच पण, ती वाढ 4 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर मात्र त्याची दुसऱ्यांदा तपासणी करणे गरजेचे असते.
फडणवीस यांच्या मतदारसंघातील 378 पैकी 263 बूथवर नव्या मतदारांची संख्या 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. 26 बूथवर 20 टक्क्यांपेक्षा अधिक आणि 4 बूथवर 40 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार वाढले आहेत. मतदारांची संख्या 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली तर तर त्याची फेरपडताळणी करावी, असे निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये आणि संकेतस्थळावरही म्हटलेले आहे. या मतदारांचा त्यांच्या पत्त्यांवर जाऊन शोध घेणे हा या प्रक्रियेचा मुख्य भाग आहे. मतदारयादी अंतिम करण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची असते.
मतदारांची संख्या 20 ते 58 टक्के वाढली!
फडणवीसांच्या मतदारसंघात असे काही बूथ आहेत जेथे मतदारांची संख्या 20 टक्के ते 58 टक्के वाढलेली आहे. या संस्थेने म्हणजे न्यूजलॉंड्रीने अशा 12 पेक्षा अधिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) भेट घेऊन फेरपडताळणी केली होती का, हे जाणून घेतले. यापैकी 6 अधिकारी बोलले. त्यातील 5 ऑन रेकॉर्ड बोलले आणि त्यांनी अशाप्रकारची कोणतीही फेरपडताळणी केलेली नाही, असे सांगितले. अन्य अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून एकगठ्ठा अर्ज मिळाले होते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे न्यूजलॉंड्रीने या वृत्तात म्हटले आहे.
अनेक मतदार पत्त्यांवर आढळले नाहीत
यापैकी एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यांच्या अखत्यारीतील बूथवर मतदारांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली. मतदार नोंदणीचे हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. पडताळणीसाठी ते आमच्याकडे पाठवण्यात आले. यापैकी फक्त काही मतदारांचीच पडताळणी आम्ही करू शकलो. आम्ही या मतदारांच्या पत्त्यांवर त्यांच्या घरांना भेट दिली. त्यावेळी शेजाऱ्यांनी सांगितले की, अशा नावांचे येथे कुणी राहतच नाही. ही बाब पर्यवेक्षकाला कळवली होती.
मतदार कसे वाढले, माहित नाही
अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ते ज्या बूथवर बीएलओ म्हणून अनेक वर्षांपासून काम करतात, तेथे मतदारांची संख्या 24 टक्क्यांनी वाढली होती. हे अनपेक्षित, धक्कादायक होते. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे 300 अर्ज प्राप्त झाले होते. नवीन मतदारांच्या एकाही अर्जावर मी सही केलेली नव्हती. मी फक्त 8 ते 10 मतदारांची नोंदणी केलेली आहे. उर्वरित मतदार कसे वाढले, हे जिल्हा निवडणूक कार्यालयच सांगू शकते. अंतिम मतदारयादी हातात आल्यानंतर मला धक्काच बसला.
लोकसंख्यावाढीच्या तुलनेत मतदारांची वाढ अधिक
अन्य अधिकाऱ्यांनी सांगितलेले अनुभवही असेच आहेत. काही बूथवर 58 टक्के, 30 टक्के, 40 टक्के मतदारांची वाढ झाली आहे. 2009 च्या निवडणुकीनंतर झालेली मतदारांच्या संख्येतील ही सर्वाधिक वाढ आहे. 2001 ते 2011 दरम्यान नागपूरच्या लोकसंख्येत 14 टक्के वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढीचा दर पाहता मतदारांच्या संख्येत झालेली वाढ अनाकलनीय आहे असे, असे सेन्सस विभागाशी संबंधित एका उच्चपदस्थ माजी अधिकाऱ्याने या संस्थेला सांगितले. 1988 मध्ये मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती, कारण त्यावेळी मतदानाचे वय 21 वरून 18 वर आणण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग काय म्हणतो पाहा…
न्यूजलॉंड्रीने निवडणूक आयोगाला यासंदर्भात एक प्रश्नावली पाठवली होती. मतदारांची संख्य़ा वाढत असते आणि मतदारांची नावे वगळलीही जातात, असे उत्तर त्याला मिळाले. लोकांचे स्थलांतर हे रोजचेच झाले आहे. मतदारांची यादी अंतिम केली जाते, त्यावेळी जी परिस्थिती आहे, त्यानुसार काम केले जाते. बीएलओ, एजंट यांचे दावे, आक्षेपानंतर मतदारयादी अंतिम केली जाते. त्यामुळे मतदारांची वाढ नैसर्गिक आहे, असेही त्या उत्तरात म्हटले आहे. 18 पेक्षा अधिक वय असलेले भारतीय नागरिक एखाद्या भागात काही काळासाठी राहत असतील आणि पत्ता म्हणून त्यांनी जी काही कागदपत्रे दिली असतील, त्या आधारावर त्यांची नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापूर्वी बीएलओकडून पडताळणी केली जाते, असेही त्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
…तर संशय बळावतच जाणार
राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपचे नेते त्यांना मुद्देसूद उत्तरे देत नाहीत. राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे, राहुल निराश झाले आहेत, काँग्रेसचा इतिहास तपासा अशा प्रकारची टीका त्यांच्यावर केली जाते. यावेळीही अशीच टीका झाली. मतदार कसे वाढले, ते कुठून आले, त्यांचे पत्ते सापडत नाहीत, हे खरे आहे का, या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. राहुल गांधी हे आरोप सातत्याने करत आहेत. त्यांच्या आरोपांना मुद्देसूद उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनातही हा संशय दृढ होऊ शकतो, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे.