
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पाटोदा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न, बोगस कामे, शासकीय योजनांमधील अपयश आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पाटोदा तालुक्याच्या वतीने आज ‘जागरण गोंधळ आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाच्या स्वरूपात झाली. मोर्चा तहसील कार्यालयासमोर येऊन आंदोलनात रूपांतरित झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, उपजिल्हाध्यक्ष सचिन मेघडंबर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
पोटखराब झालेल्या जमिनींचे तातडीने नियमितीकरण करावे. शंभर चिरा ते सरकारी दवाखाना पाटोदा या बोगस रस्त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर वितरित करावेत. संजय गांधी, श्रावण बाळ व निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वेळेवर मिळावे. घरकुल लाभार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे ५ ब्रास वाळू विनामूल्य द्यावी. ग्रामसडक योजनेतील बोगस काम करणाऱ्या अभियंते व ठेकेदारांवर कारवाई करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोगस रस्त्यांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. पांदन रस्ते, बोगस विहिरी व दलित वस्तीतील कामांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या आंदोलनात विविध भागातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.