दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर शहरातील व्यस्त भागात भरदिवसा एका सिव्हिल इंजिनिअरच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय सुनील मदगे (वय ३१), व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर व सरकारी ठेकेदार, रा. आदिनाथ नगर, शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ३:३० ते ६:३० या वेळेत व्यंकटेश हाइट समोर, बाबुराव नगर, शिरूर येथे त्यांची हुंडाई क्रेटा कार पार्क केली होती.
या दरम्यान अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून आतील बॅग चोरली. बॅगेमध्ये लेनोवो कंपनीचा लॅपटॉप होता. याची अंदाजे किंमत १५ हजार आणि ३० हजारांची रोकड होती. एकूण मुद्देमालाची किंमत ४५ हजार असून, या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राऊत हे करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दिवसाढवळ्या चोरी
शहरात दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरट्यांनी कारची काच फोडून लुटमार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा गंभीरतेने तपास करून चोरट्याचा लवकरात लवकर माग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
