
दैनिक चालु वार्ता म्हसळा-(रायगड)प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – तालुका भूमिअभिलेख कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांपासुन धनदांडग्या लोकांची जमीन मालमत्ता बाबत नित्याची कामे असतात त्या मध्ये प्रामुख्याने
जमीन मोजणी अर्ज करणे,जमीन मोजणी नोंदणी करणे,हद्द कायम करणे,जमीन विभागणी करणे,
नकाशा तयार करणे आदि भू-मापनाची कामे करण्यासाठी कार्यालयात रोजच लोकांची गर्दी असते.परंतु येथे सर्वसामान्य जनतेला विनंती करून वेळीच सेवा दिली जात नाही.सामान्य शेतकरी,नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत.रीतसर अर्ज दाखल करूनही लोकांना सातत्याने फेऱ्या मारायला लावतात मात्र हेच काम खाजगी जमीन खरेदी विक्री करणारे एजंट यांचा असल्यास येथील संबंधित अधिकारी व कर्मचारीवर्ग त्यांचे काम लागलीच करून देत असल्याचे निदर्शनास येत असून म्हसळा तालुका भूमिअभिलेख कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार होत असल्याने सामान्य नागरिकांची जमीन मोजणी किंवा नोंदीची कामे वर्ष-वर्ष रखडत आहेत.एकंदरीत येथे अंधाधुंद कारभार बघायला मिळत आहे.भूमिअभिलेख म्हसळा कार्यालयाचे कामकाजात सुधारणा व्हावी यासाठी माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील यांनी खासदार सुनिल तटकरे यांना पत्र लिहून भूमीअभिलेख कार्यालयाचे मनमानी कारभारावर लगाम घालण्यासाठी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.दिनांक २६ जुन २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती आढावा बैठकीत खासदार सुनिल तटकरे यांना दिलेल्या
पत्रात आपल्या माध्यमातून तालुक्यातील सामान्य माणसाला न्याय मिळावा असे नमुद केले आहे.