
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
बोईसर, २५ जून २०२५ – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासींच्या वनहक्क दाव्यांसाठी भारताचा माक्सवादी-लेनिनवादी ‘लाल बावटा’ पक्षाने बोईसर येथील वनविभाग कार्यालयावर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू केले होते. २५ जून रोजी सुरू झालेल्या या आंदोलनाला अखेर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मध्यरात्री आंदोलन स्थगित करण्यात आले.
बोईसर एसटी डेपो येथून सकाळी दोन रांगेत आदिवासींनी शिस्तबद्ध रॅली काढत मोर्चाला सुरुवात केली. लाकडाचे भारे, टोप, कांदा-बटाटा, तांदूळ, स्वयंपाकाचे साहित्य घेऊन हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष आदिवासी सहभागी झाले होते. मोर्चा वनविभाग कार्यालयावर धडकताच पोलिस व वनअधिकार्यांची तारांबळ उडाली. आंदोलनाची भूमिका आक्रमक होती.
मोर्चाचे सभेत रूपांतर झाले आणि त्यामध्ये राज्य सचिव काॅ. आदेश बनसोडे, जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ, शहापूर तालुका सचिव काॅ. भगवाण म्हणणे, डहाणू तालुका कमिटी सदस्य काॅ. वामन किंडरा, काॅ. किरण डुबळा आदींची जोशपूर्ण भाषणे झाली. त्यांनी वनविभागाला कठोर शब्दांत धारेवर धरले.
या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. काॅ. सिता जाधव, काॅ. भारती गुजर, काॅ. अरुणा मुकणे यांनी परिस्थितीवर आधारित आंदोलनपर गाणी सादर करून वातावरण सतेज केले. आंदोलन स्थळी स्वयंपाकाच्या चुली पेटवून भोजन तयार करण्यात आले. जोरदार पावसात छत्री धरून चुली पेटवत केलेल्या स्वयंपाकाचे दृश्य प्रेरणादायी ठरले.
दरम्यान, डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंढरीनाथ पाटील, ग्रामसेवक, सरपंच, वनहक्क समिती यांना घेराव घालण्यात आला. प्रशासनासोबत चाललेल्या चर्चेनंतर सुरुवातीला केवळ आश्वासने देण्यात येत होती, मात्र “आश्वासन नको, अमलबजावणी हवी” अशी ठाम भूमिका लाल बावटा पक्षाने घेतल्यानंतर प्रशासन कार्यान्वित झाले.
शेवटी सर्व प्रलंबित वनदावे पूर्ण करून त्यांची नोंद प्रांत कार्यालयात करण्यात आली. त्यामुळे रात्री उशिरा कमिटीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
पोलिस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल बोईसर पोलीस निरीक्षक पवार यांचे विशेष आभार दाभोण गाव कमिटीचे सचिव काॅ. रामजी बरड यांनी मानले.