
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकमध्ये भाजप व शिवसेना(शिंदे गट) कडून विरोधी पक्षातील मात्तबर नेते गळाला लावून त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा कार्यक्रम जोरात सुरु आहे.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेतच विरोधी पक्षातील नेते पक्षात घेण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
माजी आमदार अपूर्व हिरे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदेंनी जवळपास त्यांना गळाला लावलच होतं. त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. मात्र भाजपच्या संकट मोचक असलेल्या गिरीश महाजन यांनी चाक फिरवलं अन् शिवसेनेच्या वाटेवर असलेले हिरे हे माघारी फिरुन आता भाजपच्या वाटेवर आले आहेत.
अपूर्व हिरे यांच्यासह अमळनेर येथील एका माजी आमदाराला शिवसेनेत घेण्याच्या हालचाली सुरु होत्या. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर रविवारी पक्षप्रवेशाचा मुहुर्तही ठरला होता. मात्र मध्येच गिरीश महाजन यांनी डाव टाकला आहे. अपूर्व हिरे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाजन यांनी हालचाली गतिमान केल्या. हिरे यांचे मन वळवण्यात महाजन यांना यश आल्याचही बोललं जात आहे.
शिवाय भाजपमध्ये प्रवेशासाठी आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून अधिकृत निमंत्रण आल्याची माहिती अपूर्व हिरे यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंदर्भात कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजप उद्धव सेनेतील जास्तीत जास्त मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात शिंदे सेनेचा अडसर ठरु नये यासाठी शिवसेनेच्या महत्वाकाक्षांना भाजपने ब्रेक लावला आहे. हिरे यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यास त्यांचे पारंपारिक विरोधक असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा गट मात्र सुखावणार आहे. याउलट त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला असता तर भुसे यांची कोंडी झाली असती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गटातून) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. मात्र महायुतीची सत्ता आल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत (अजित पवार गटात) प्रवेश केला. परंतु दादा भुसे यांच्याकडून हिरे यांच्या शिक्षण संस्थेतील अनियमितता बाहेर काढण्यात आल्याने ते पाहाता ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.