
राज्यात सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांनी एकत्र येत पाच जुलै रोजी विराट मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाची तयारी अगदी जय्यत पातळीवर सुरू असून मनसे आणि शिवसेना नेत्यांकडून जोरदारपणे मोर्चा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, हिंदी सक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला मनसेकडून ट्विटर पोस्टच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवी मुंबई मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदीहृदयसम्राट असा कुत्सित टोला देण्यात आला असून त्यामध्ये त्यांना मराठीचे मारेकरी हिंदीची सेवेकरी असे म्हणत नवी मुंबईसेकडून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हिंदी सक्तीकरणाविरोधात प्रचंड रोष
राज्यांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीकरणाविरोधात प्रचंड रोष उभारून आला आहे. त्यामुळे हिंदी सक्ती मागे घ्यावी अशी मागणी एकमुखाने होत आहे. मात्र अजूनही सरकारी पातळीवर याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजप निर्णय दामटण्याचा प्रयत्न करत असला, तरी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटांमध्ये मात्र संमिश्र भावना आहे. त्यामुळे हिंदीवरून महायुतीमध्येच दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे पाच जुलैृच्या मोर्चाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे.
अमेय खोपकर यांचा मराठी कलाकारांना इशारा
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सुद्धा मराठी कलाकारांना इशारा देत कृतज्ञतेची भावना ठेवत पाच जुलै रोजी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की ज्या मराठी भाषेमुळे प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण कृतज्ञता म्हणून सर्वांनी पाच जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया पाच जुलैला मराठी मालिका चित्रपट यांच्या शूटिंग बंद ठेवावे अशी विनंती असल्याचे पोस्टमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर यांना मोर्चाच्या आयोजनासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून अनिल परब सक्रिय आहेत. वरूण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीगाठी होत आहेत. संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांचीही भेट झाली आहे.