
राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. 5 जुलैला होणारा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी शिवसैनिक व मनसैनिकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
या मोर्चाची तयारी सुरु असतानाच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि. २९ जून) मोठे विधान केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार हिंदी संदर्भातील विषयावर चर्चा
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती नको. इयत्ता पाचवीपासून हिंदी शिकविण्यास हरकत नाही, अशी आम्ही यापूर्वीच भूमिका घेतली आहे. आता ५ जुलै रोजी मोर्चा काढला जाणार असला तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदी संदर्भातील विषयावर चर्चा केली जाईल. ५ जुलैला मोर्चा काढण्याची वेळच येवू देणार नाही, असे संकेतही अजित पवारांनी दिले आहे.
मोर्चाचे रुपांतर विजयी मोर्चा म्हणून करु : मनसे नेते यशवंत किल्लेदार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोर्चाबाबत केलेल्या विधानानंतर संभ्रम निर्माण झाला. अशातच अद्याप मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. याबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज ठाकरे यांनी मागील काही दिवस सातत्याने हिंदी सक्तीच्या विरोधात आपले मत मांडले आहे. मान्यवरांची मराठी भाषेबाबत असणार्या मतांचे आम्ही बॅनर लावत आहोत. आम्ही मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका घेत आहोत. आता सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला तरी आम्ही मोर्चाचे रुपांतर विजयी मोर्चामध्ये करु, असेही यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केले.
रेकॉर्ड ब्रेक मोर्चासाठी मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी
5 जुलैला होणारा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी दोन्ही सैनिकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.या मोर्चासाठी मुंबई शहर व उपनगरातील एका प्रभागातून किमान एक ते दीड हजार अशा 227 प्रभागातून अडीच ते साडेतीन लाख सर्वसामान्य मराठी माणूस सहभागी करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठी माणूस मुंबईत दाखल होणार आहे. हिंदी भाषासक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे गेल्या 14 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. त्यामुळे शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साह दिसत आहे.या मोर्चात जास्तीत जास्त मराठी माणूस सहभागी व्हावा यासाठी सोशल मीडियासह प्रभागातील चौक, प्रमुख स्थळे, रेल्वे स्टेशन परिसर येथे जाहिरातबाजी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. विशेष म्हणजे ही पोस्ट करत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव व राज यांचे फोटो छापले जात आहेत.