
नागपूर : उद्धव ठाकरे यांनी मराठी- मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घातच केलाय. त्रिसूत्रीत तीन भाषा जाहीर कराव्या, असा माशेलकर समितीचा अहवाल होता.
माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र आपलं पाप लपवण्यासाठी उद्धव ठाकरे हा सगळा प्रयत्न करत होते, पाप झाकण्याचा जर प्रयत्न असेल तर एक चित्रपट उबाठावर निघू शकतो, अशी खोचक टीका भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय रद्द केला, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे. असेही खासदार अनिल बोंडे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे – अनिल बोंडे
नरेंद्र जाधव यांची समिती अभ्यास करेल आणि कुठल्या वर्षापासून हिंदी भाषा शिकविली जाऊ शकते यासंदर्भात अहवाल देईल. हा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचं असेल तर जास्त भाषा त्यांना आल्या पाहिजे. शिवाय मुंबईमध्ये नेत्यांच्या मुलाना फ्रेंच, इंग्रजी शिकवतात, आमच्या ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबत इंग्रजी का शिकवू नये? हिंदी का शिकू नये? त्यांना समोर का जाता येऊ नये? असा सवाल देखील खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी उपस्थित केला.
यावर चित्रपट काढायला आता काय हरकत आहे?- अनिल बोंडे
पक्ष वाढीसाठी विजय सभा, अस्तित्व टिकवण्यासाठी विजय सभा या उद्धव ठाकरे यांना घ्यावीच लागेल. शिवाय स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावे लागतात. मात्र यावर चित्रपट काढायला आता काय हरकत आहे? असा सवाल करत खोचक टोलाही खासदार बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज्य सरकारकडून हिंदीचा जीआर रद्द
पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. या संदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावे की नाही यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती माशेलकर समितीचा अभ्यास करणार आणि त्यावर शिफारशी करणार आहे. त्यानंतर राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारने हिंदीचा जीआर रद्द केला हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं मत संजय राऊत तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.