
फडणवीस अन् पवारांसमोर पहिल्यांदाच ‘डिनो मोरिया’चं नाव घेतलं !
राज्यातील महायुती सरकारचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी कॅबिनेट बैठक झाली. यात वेगवेगळ्या विषयांवर सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली.
प्रथेप्रमाणे अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मिठी नदीच्या घोटाळ्याचा उल्लेख करताना डिनो मोरियाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर शिंदेंनी थेट पहिल्यादांच डिनो मोरियाचा उल्लेख केल्याने या घोटाळ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे सेना पक्षाला सूचक संदेश असल्याची चर्चा आता रंगली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा निकटवर्तीय असलेला डिनो मारिया याच्या कंपनीने मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम घेतले होते. या कामात घोटाळा झाल्याची तक्रारीची मुंबई आर्थिक गु्न्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.
तसेच डिनो मोरिया याच्या घरावर ‘ईडी’ने याप्रकरणी छापा देखील घातला आहे. ‘ईडी’ने चौकशीसाठी दोनदा समन्स देखील बजावलं आहे. हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनापूर्वी महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात उपमुख्यमंत्री शिंदेनी वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगताना डिनो मोरियाशी संबंधित मिठी नदी गाळ काढण्याच्या कामाच्या घोटाळ्याचा उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांच्या कामाची पद्धती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, त्यांची काय उत्तरे आहेत ती सभागृहात देऊ. भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांचा सत्तेताली अडीच वर्षांचा काळ कसा गेला, यातील वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
खिचडी घोटाळा, औषध घोटाळा, रस्त्यातील कामांमध्ये घोटाळा, मिठी नदी घोटाळ्यात त्यांचा कोण, डिनो मोरियाची चौकशी सुरू आहे. त्याने तोंड उघडल्यावर किती लोक मोर होतील माहिती नाही. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची कामांमध्ये घोटाळा झाले आहे. आयुक्तांना बोलावून रस्त्याच्या कामांचे निर्णय झालेले आहे. दरवर्षी खड्डे बुजवण्याचे, पांढऱ्याचा काळं अन् काळ्याचं पाढर करण्यात यांची सत्ता गेली. आम्हाला हे काही माहितच नाही. चौकशीत सत्य बाहेर येईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.