
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
————-
दिवा- अनधिकृत शाळांचा सुळसुळाट असलेल्या ठाणे महापालिका हद्दीतील एकट्या दिवा शहरात सर्वाधिक ६९ शाळा आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दिवा शहरातील अनधिकृत शाळांची संख्या झापाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. यातच अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी अधिकृत शाळेंच्या संघटने मार्फत सततचा पाठपुरावा ही सुरू असून दरवर्षी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सूचना प्रसिद्ध करण्या खेरीज कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने अखेर दिवा शहरात असलेल्या १९ अधिकृत शाळा संचालकांनी येत्या १ जुलै पासून आपल्या शाळेंचा बेमुदत बंद पुकारला आहे.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांच्या समायोजनाची व्यवस्था करून देखील अनधिकृत शाळा बंद न करण्यात आल्यानेच आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे संघटनेच्या अध्यक्षांने म्हटले आहे.
अधिकृत शाळांनी आपले आंदोलन मागे घ्यावे याकरता शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी सर्व अधिकृत शाळेंना परिपत्रक काढून आवाहन केले आहे. परंतु दिवा शहरातील सर्व शाळा संचालक बंद वर ठाम असून जोवर अनधिकृत शाळा बंद होत नाहीत तोवर हे बेमुदत शाळा बंद आंदोलन सुरूच राहील असे म्हटले आहे.
शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेठीस धरून न्याय मिळवणे ही पद्धत अयोग्य असल्याचे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त नागरगोजे यांची भेट घेऊन बंद पुकारणाऱ्या शाळांना आवर घालण्याबाबत आवाहन केले. या शाळेंनी नियमबाह्य पद्धतीने बंद केल्यास त्यांच्याविरोधात सक्त कारवाई करण्या संबंधित चर्चा देखील केली, अनधिकृत शाळा बंद करण्याकरता न्यायालयीन लढाई लढून त्यांना कायमचे बंद करा परंतु लहान मुलांना वेटीस धरून देशाच्या भावी पिढीचे नुकसान होऊ देणार नाही असे दिवा शहर संघटिका ज्योती पाटील म्हणाल्या.