
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-आषाढी एकादशीला वारकऱ्यांची मदत करण्यासाठी असंख्य हात पुढे सरसावत आहे.इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली (तळेवाडी) येथील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना प्रेमाने १२०० लोकांना व्हेज दालच्या राईस,५० किलो तांदूळ,१०० लिटर दूध तसेच शिरखुर्म्याचं वाटप केलं आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना समोर येत असताना इंदापूरमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांना मुस्लिम कुटुंबियांनी शिरखुर्मा देत सेवा करण्याचं काम केलं आहे. तालुक्यातील शेटफळ हवेली गावातील लोकांनी हा प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. त्यामुळं आता त्यांचं कौतुक केलं जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ७ वर्षांपासून ते वारकऱ्यांची सेवा करत समाजात एकोपा आणि शांततेचा संदेश देत आहे. त्यांनी सेवा केल्याने अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रेमाचा संदेश दिला आहे.
वारकऱ्यांना पंढरपुरात पोहचण्यासाठी शेकडो किमी अंतर चालावं लागतं. त्यामुळं आम्ही त्यांना ऊर्जा देणारा शिरखुर्मा देण्याचं काम करत असल्याचं सलमान मुलाणी यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही इस्लाम धर्माला मानत असलो तरी पैगंबरांनी मानवतेची शिकवण दिलेली आहे. वारकरी पंथात मोहम्मद शेख यांच्यासारखे संत होऊन गेलेत. वारकऱ्यांची सेवा केल्याने आत्मिक आनंद आणि समाधान मिळतो, असंही सलमान मुलाणी यांनी म्हटलं आहे.
चंद्राश्विन उद्योग समूह, सलमान मुलाणी,शफिक मुलाणी,बनशिद मुलाणी, अब्दुल मुलाणी,गोरख पंराडे,हानुमंत झोळ, तोरसकर दाजी, सोहम कुंभार,आमन दामते,कृष्णा कुंभार, माऊली देवकते,पिंटु बारेला,टिंग्या बारेला, सुनील बारेला,कंत्या काका, दिलदार बारेला या बांधवांनी मोठ्या प्रेमाने आणि आदराने सेवा केल्याने दिंडीतील काही वारकरी भारावून गेले होते. त्यामुळं आता देशभरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे एकतेचा संदेश देणाऱ्या घटनेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.