
दैनिक चालू वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
पालघर जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या विकास कामांच्या वाटपात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केला आहे. सन २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात कामवाटप समितीच्या मंजुरीशिवाय थेट ‘मर्जीतल्या ठेकेदारांना’ कामे वाटप केल्याचा त्यांनी ठपका ठेवला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार निकोले यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम, लघुपाटबंधारे आदी विभागांतील लाखोंच्या कामांना कामवाटप समितीची मंजुरी आवश्यक असतानाही, जवळपास ५० टक्के कामे अधिकाऱ्यांनी थेट “आगाऊ टक्केवारी” देणाऱ्या ठेकेदारांना दिली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नियमबाह्य पद्धतीने कार्यारंभ आदेश देऊन इतर पात्र संस्था, बेरोजगार अभियंते यांच्यावर अन्याय केल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.
तलासरी पंचायत समिती अंतर्गत समग्र शिक्षा अभियानातील कनिष्ठ अभियंता आणि कामवाटप समितीतील काही अधिकारी यांनी संगनमताने लाखोंची कामे ‘सेटिंग’ वर वाटली, असा थेट आरोप आमदार निकोले यांनी केला आहे. यामुळे पारदर्शकतेचा संपूर्ण फज्जा उडाला असून, राजकीय वरदहस्ताखाली भ्रष्टाचार फोफावल्याची गंभीर शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी शासनाकडून उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांची सेवा खंडीत करण्याची मागणी आमदार निकोले यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेची विकास कामे कामवाटप समितीमध्ये मंजूर न करता मर्जीतल्या ठेकेदारांच्या शिफारशीवर थेट कार्यारंभ आदेश दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे हे कामवाटप समितीच्या नियमांची थेट पायमल्ली आहे. विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे.
-विनोद निकोले, आमदार डहाणू विधानसभा
पालघर जिल्हा परिषदेच्या विकास कामासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते आणि योग्य खुलासा व टिप्पणी शासनाकडे सादर करण्यात आली आहे.
-जागृती संखे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पालघर