
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी -मनोजकुमार गुरव
आज दिनांक 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते मा. वसंतराव नाईक यांची जयंती शाळेमध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक नागेंद्र समन व सरपंच विजयाताई जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शालेय आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार लक्ष्मीकांत पटणे यांनी केले.
तत्पश्चात आप्पराव पाटील यांचा मुलगा हर्षद पाटील याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यात वह्या, पेन, बिस्किटे आदी साहित्य समाविष्ट होते. सदर साहित्य देण्यात येताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचे स्मरण करून ‘स्वच्छता, पर्यावरण आणि शिक्षण’ या तिन्ही क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास पोलिस पाटील लक्ष्मण पांचाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत धुमाळ, गावातील पालकवर्ग, शिक्षक विठ्ठल कुलकर्णी, लक्ष्मण येवते, लतिफ लदाफ, चित्ररेखा दंडे, तनुजा गाढवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी आभार शिवकुमार स्वामी यांनी मानले.