
दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी -किशन वडारे
————————————————-
लातूर /चाकूर येथील मुख्य बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, या हेतूने नगरपंचायत चाकूर अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे नव्यानेच बांधकाम करून एक वर्ष सुद्धा पूर्ण झाले नाही, तर नव्यानेच सुरू केलेले स्वच्छतागृहाचा मैला जाण्याचे चेंबर फुटल्यामुळे परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी उठली आहे व सार्वजनिक शौचालयासाठी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सदरील स्वच्छालय पाण्याविना बंद असल्याने, प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकातील संडास व मुतारी गेले काही दिवसांपासून पाण्याविना बंद असल्याने महिला, वृद्ध, अपंग व लहान मुलांसह प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
सध्या पावसाळा सुरू असून प्रवासादरम्यान अनेकांना संडास व मुतारीची आवश्यकता भासत असते. मात्र, बसस्थानकावर स्वच्छतागृहांमध्ये साफ-सफाईची व पाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे तिथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी दररोज चाकूर, लातूर, औसा, नांदेड, निलंगा, अहमदपूर आदी मार्गांवरील प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. विशेषतः महिलांना यामुळे अत्यंत अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांचे म्हणणे
“आम्ही महिला प्रवासी आहोत. लहान मुले घेऊन प्रवास करावा लागतो. संडास बंद असल्याने किती त्रास होतो हे प्रशासनाला समजायला हवे. महिलांना मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे उघड्यावर बसावे लागत आहे व त्याच ठिकाणी पुरुषही येत असल्यामुळे महिलांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. एवढ्या मोठ्या बस स्थानकावर पाण्याची सोय नसणे म्हणजे प्रवाशांवर अन्याय आहे,” येथील प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बघ्याची भूमिका घेत आहे, असे एका महिला प्रवाशाने संतप्त प्रतिक्रिया दिली.
प्रशासनाची भूमिका
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक लंबे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही, त्यामुळे बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक तोगरगे यांना विचारणा केली असता त्यांनी नगर पंचायत यांना बस स्थानकामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे चेंबर फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लेखी कळवून सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे आम्ही नगरपंचायत यांना लेखी कळवण्यात आले आहे. “लवकरात लवकर पाण्याची सोय करून स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” दोन-चार दिवसांमध्ये ते सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.
स्थानिकांची मागणी
स्थानिकांनी आणि प्रवाशांनी संडास व मुतारीची व्यवस्था तात्काळ पूर्ववत करावी, सार्वजनिक स्वच्छता गृहाचा मैला जाण्याचा पाईप फुटला असून त्यामुळे बस स्थानक परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली आहे, शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे ती व्यवस्थित करून नियमित साफसफाई व पाणीपुरवठा करावा, तसेच प्रशासनाने प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात याची गांभीर्याने दाखल घेऊन तातडीने सुविधा पूर्ववत कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.