दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : ‘‘समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी दिलेल्या बलिदानाचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढे जावे. त्यांच्याद्वारे दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास समाज शारीरिक व मानसिक दृष्ट्याही सुदृढ होईल,’’ असे प्रतिपादन डॉ. माधवराव चंबुले यांनी केले.
येथील उदयगिरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डे निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
अनिस उदगीर शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी डॉ. माधव चौगुले यांचा, उपाध्यक्ष माशाळकर यांनी डॉ. स्वामी यांचा, तर प्रा. डॉ. बळीराम भूक्तरे यांनी डॉ. वडगावकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची प्रतिमा देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना डॉ. चंबुले म्हणाले की, ‘‘समाजात अंधश्रद्धेमुळे प्रगती रोखली जाते. डॉ. दाभोळकरांनी समाजातील वैद्यकीय अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधन केले आणि व्यसनमुक्त समाजासाठी चळवळ उभारली. त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्यास समाज आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव शिरीष रोडगे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास हॉस्पिटलमधील रुग्ण, परिचारिका आणि नागरिकांची उपस्थिती होती.
डॉक्टर्स डेच्या औचित्याने विवेकी, आरोग्यदायी आणि अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीचे महत्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
