
भाजप आमदाराला मनसेचा थेट इशारा !
मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्यावरून राजकारण पेटले आहे. एका व्यापाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह मनसेच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. त्यातून वाद झाला. व्यापाऱ्यलाा मारहाण करण्यात आला.
त्याविरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. मात्र, मनसेने या मोर्चा भाजपने काढल्याचे सांगितले. त्यासाठी भाजपचे आमदार नरेंद्र मेहत आणि भाजपच्या इतर नेत्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत , ‘बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एव्हढाच’
देशपांडे यांनी मेहता बिहता म्हणत थेट आमदार नरेंद्र मेहता यांनी इशारा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध इतर भाषिक हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपने मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढला. त्यांनी बळजबरीने व्यापाऱ्यांना गोळा केले. व्यापारी नाही तर भाजपचे लोक त्यामध्ये होते. मराठी माणसाच्या विरोधात भाजपने आंदोलन घडवून आणले. मराठी मतांचा अपमान करत भाजपने केवळ राजकारणासाठी मोर्चा काढला, अशी टीका देखील मनसेच्या नेत्यांनी भाजपवर केली.
मेहता यांनी या प्रकरणावर आधीच ट्विट करत मराठीचा अभिमान, पण माणुसकीच्या मर्यादा विसरून नाही. मिरा-भाईंदर परिसरात एका जैन/मारवाडी समाजातील व्यापाऱ्यास त्याने मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे म्हणत या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
मराठीचा प्रचार सहिष्णुतेने व्हायला हवा
महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा भाग आहे. मराठीचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे – परंतु तो प्रेमाने, समजुतीने आणि सहिष्णुतेने व्हायला हवा, असे मेहता यांनी म्हटले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घडलेली ही हिंसक घटना केवळ एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरून त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आघात करते आणि महाराष्ट्राच्या सहिष्णु परंपरेला धक्का देते. मी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो आणि संबंधित यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही माझी स्पष्ट भूमिका असल्याचे म्हटले.