
स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाच्या नेत्यांसह कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी थेट विधान करत आहेत.
अशातच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यावर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
तटकरे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तटकरे यांनी महानगर पालिकेच्या निवडणुका महायुतीसोबतच लढणार असल्याचे संकेत दिले. तसेच पक्षाला येत्या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वासदेखील व्यक्त केला.
यावेळी तटकरे यांनी भाषण करताना अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्रा व्हावे अशी त्यांची क्षमता आहे. कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे वाटत आहे. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. पक्षाचे संख्याबळ विचारत घेता अजित पवा स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला महायुतीतच राहून राजकारण करावे लागेल. मात्र, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना भाजपला कळविण्यात येईल, असे तटकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही
तसेच, तटकरे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि अजित पवार पक्षाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आगामी काळात होणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. असे कोणतेही प्रस्ताव पक्षाकडे नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय विचारपूर्वक केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०१४ आणि २०१५ मध्ये भाजपा बरोबर जाण्याची चर्चा चार ते पाच वेळा झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी तो निर्णय लांबणीवर पडायचा, असा दावा तटकरे यांनी केला.