दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी- अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र जनएकता संघटना, उदगीरच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली.
शहरातील रस्त्यांवर व गल्लीबोळांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, हे कुत्रे पायी जाणाऱ्या नागरिकांना, दुचाकीस्वारांना, विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना अचानक हल्ला करून चावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जनएकता संघटनेने निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले आहे की, “शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
निवेदन देताना महाराष्ट्र जनएकता संघटनेचे तालुकाध्यक्ष सिकंदर भैय्या शेख, प्रा. राजेश चव्हाण, उत्तम बिरादार, शहराध्यक्ष नोमान सय्यद, शहर उपाध्यक्ष वजिर सय्यद, इस्माईल मनियार, अभिजीत तोरे, सल्लागार चंद्रकांत कस्तुरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
—
