
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा !
ते दोघे आले आणि त्यांनी जिंकलं. मराठी मुद्द्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. यानिमित्ताने वरळीतील डोममध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती.
दोघे एकत्र व्यासपीठावर येताच सभागृहात एकच जल्लोष झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी भाषण केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. इतकं केलं तरी बरं नाहीतर त्या पोरीलाच पळून जातील, अशा शब्दात भाजपला टोला लगावला.
भाजपबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे तुमच्याहीपेक्षा जास्त कडवट कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच.