दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
महाराष्ट्र राज्यातील वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता वाहन तपासणी दरम्यान त्यांच्या खासगी मोबाईल फोनचा वापर करून फोटो किंवा व्हिडीओ घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हा निर्णय परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै रोजी विधान भवन, मुंबई येथे झालेल्या वाहतूक समन्वय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत वाहनचालकांच्या तक्रारींचा विचार करून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले.
अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखांना जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी वाहनचालकांची छायाचित्रे किंवा व्हिडीओ केवळ अधिकृत ‘रीअल टाईम मोबाईल सिस्टिम’च्या माध्यमातूनच घ्यायचे आहेत.
खासगी मोबाईलमधून फोटो घेतल्यास गोपनीयतेचा भंग, गैरवापर आणि तक्रारी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहनचालकांच्या हक्कांचे संरक्षण करताना तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्त टिकवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
