
दारुड्यांना अशी शिक्षा द्या की…
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ‘महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक २०२५’ विचारात घेण्यात यावे यासाठी प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवार यांनी दारूशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाईच्या तरतुदीचीही मागणी केली. याबाबत बोलताना, त्यांनी “सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना अशी शिक्षा करावी की, त्यांची नशा एका मिनिटात उतरायला हवी”, असे वक्तव्य केले.
शिक्षेच्या तरतुदी आणखी कठोर करण्याची गरज
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. दारूबंदी सुधारणा विधेयकाचा प्रस्ताव मांडताना ते म्हणाले की, “समाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे. यामुळे महिला वर्गामध्येही असुरक्षतेचे व असंतोषाचे वातावरण आहे. सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर दारू पिऊन अश्लीलता निर्माण करणारे प्रकार वाढत आहेत. हे असले प्रकार करण्याची हिंमत का होते, याची कारणे जाणून घेतल्यावर लक्षात येते की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदी आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे.
एका मिनिटाच्या आत…
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसाठीच्या शिक्षेबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी कायदा केला पाहिजे. त्यांना देहदंड देता येणार नाही हे मी समजू शकतो. पण, अशी शिक्षा दिली पाहिजे की, एका मिनिटाच्या आत त्याची नशा उतरावी आणि पुढच्या जन्मीही दारू पिताना दहादा विचार करावा.”
दारू पिऊन मोक्षाचा मार्ग सापडत असेल, तर…
“दारू प्यायची की नाही, हा त्या-त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी मुंबईतच एका दुकानाचे नाव वाचले, ‘संस्कार देशी दारूचे दुकान’. ठीक आहे, नाव जरी संस्कार असेल तरी त्यांनी संस्कार म्हणून आपल्या घरी दारू प्यावी. मी परवा प्रेम सन्सकडे जात होतो, तिथे असलेल्या एका वाईन शॉपचे नाव ‘मोक्ष विदेशी वाईन शॉप’ आहे. याबाबत काही अडचण नाही. कोणाला दारू पिऊन मोक्षाचा मार्ग सापडत असेल, तर आमचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही,असे मुनगंटीवार पुढे म्हणाले.
दारूचे उत्पन्न महत्त्वाचे साधन
सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त दारूवर उभी आहे, हा समज सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांनी करून घेऊ नये. हे खरे आहे की, महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार कोटींची दारू प्यायली जाते. महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या साधनांपैकी दारूचे उत्पन्न हे महत्त्वाचे साधन आहे, हे जरी खरे असले तरी आपल्यावर एक जबाबदारी आहे.