
नाराजी दूर होताच महाजनांची भूमिका; काय म्हणाले ?
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या पक्षाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांना नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.
त्यामुळे त्यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीनंतर मात्र पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर आता महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले आहे. संतापाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी घडल्या, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
प्रकाश महाजन यांच्या नाराजीचे वृत्त समोर आल्यानंतर मनसेचे नेतेअमित ठाकरे यांनी महाजन यांना कॉल केला होत. या दोन नेत्यांवर नाराजीच्या विषयावर चर्चा झाली होती. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशीही महाजन यांची चर्चा झाली होती. आज पुन्हा अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यात बैठकही झाली आहे. या बैठकीनंतर आता महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले.
महाजन नेमकं काय म्हणाले?
आमच्यात नेमकी काय चर्चा झाली आहे, त्याचा तपशील मी सांगणार नाही. मात्र माझ्याकडून काही गोष्टी संतापाच्या भरात घडल्या. आता सगळं सुरळीत चाललं आहे. त्यांनी मला पक्षाचं काम करायला सांगितलंय. अमित ठाकरे माझ्या कायमच संपर्कात असतात. मी त्यांना काही गोष्टी बोललो आहे. त्या बाबींवर हळूहळू तोडगा निघेल, असे यावेळी प्रकाश महाजन यांनी सांगितले.
राज ठाकरे बोलवतील त्या दिवशी भेटणार
त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयीही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे साहेबांसोबत माझी चर्चा झाली नाही. मला राज ठाकरे जेव्हा बोलवतील त्या दिवशी मी त्यांना भेटणार. माझे मत अमित ठाकरे राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतील, असे त्यांनी यावेळीसांगितले. तसेच मी मनसेच कायम सक्रिय असेल, अशी खात्रीही त्यांनी यावेळी दिली.
महाजन यांची नेमकी नाराजी काय होती ?
नाशिकच्या इगतपुरी येथे मनसेचे तीन दिवशीयशिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. खुद्द राज ठाकरे हेदेखील या शिबिराला उपस्थित राहिले होते. या शिबिरात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर कोणाही काहीही बोलू नका. मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करेन, असे यावेळी राज ठाकरे यांनी आदेश दिले होते. तसेच पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र या महत्त्वाच्या शिबिराला प्रकाश महाजन यांना बोलवण्यात आले नव्हते. यावरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मी घरी काय तोंड दाखवू. माझ्या पक्षात आज दिवाळी सुरू आहे आणि माझ्या घरात अंधार आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच यावेळी नारायण राणे प्रकरणात पक्षाने मला साथ दिल नाही. पण मी ते विसरलो, असेही महाजन म्हणाले होते. आता मात्र त्यांची नाराजी दूर झाली आहे.