
उद्धव ठाकरे संतापले !
विधानभवनाच्या लाॅबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले. पडळकर यांचे समर्थक कार्यकर्ते हृषिकेश टकले आणि आव्हाडांचे मुख्य कार्यकर्ते नितिन देशमुख यांच्यात तूफान हाणामारी झाली.
पडळकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली तर आव्हाड हे संतापले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मोठी मागणी केल्याने ट्विस्ट आला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ते समर्थक नाहीत गुंड आहेत. ही जर परिस्थिती आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? त्यांना ज्यानी पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मग तो कोणीही असेल. ज्यांनी पास दिले त्यांचे नाव समोर आले पाहिजे. कारण हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे.
आमदारांना धक्काबुक्की हे विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे अवघड आहे. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी सगळ्या गोष्टी सोडून त्या गुंडावर आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तरच तुम्ही या राज्याच्या जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेते आहात, असे मी म्हणेल. असे देखील ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विधानभवनाच्या लाॅबीमध्ये झालेल्या हाणामारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले जी घटना झाली ती अतिशय चुकीची आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांच्या अंतर्गत हा परिसर येतो. त्यामुळे कडक कारवाई करण्याची मी त्यांना विनंती करणार आहे.