
आव्हाडांनी सांगितलं तर पडळकर म्हणतायत आमच्या सहकाऱ्यांकडून चूक !
विधानभवनाच्या परिसरात गुरुवारी आमदार जितेंद्र आ्व्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. याचे पडसात मध्यरात्री उमटले. या घटनेप्रकरणी आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली.
त्यानंतर मध्यरात्री आव्हाडांसह समर्थकांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही आमदारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानभवनात नेमके काय घडले? याची सविस्तर माहिती दिली आहे.
पाच-पाच जण मारत होते, आव्हाडांनी सांगितलं
घटनेची माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला मारायला पाच जण तिथे आले होतं. त्यांना मारायला कोणी सांगितलं होतं त्याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहेत. पाच-पाच जण मारहाण करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय आणि तुमचे पोलीस काय करतायत? पोलीस मारेकऱ्यांना वडापाव घेऊन जात आहेत. त्याला तंबाखू मळून देतायत. चव्हाण म्हणून इथले पोलीस निरीक्षक आहेत ते व्हिडीओमध्ये दिसत आहेत. माझ्याकडे सर्व व्हिडीओ आहेत. गुन्हेगारांची इतकी सरबराई का होतेय.
नेमकं काय म्हणाले पडळकर?
काल मी या सगळ्या प्रकारावर भूमिका व्यक्त केली होती. मी माननीय अध्यक्ष महोदयांकडे दिलगिरी व्यक्त केली. मी अध्यक्षांना विनंती केली होती की, आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांना सक्त ताकदी देऊन जी काय कारवाई करायची ती करा, असे मी त्यांना सांगितले. हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारितील विषय आहे. रात्री उशीरा याप्रकरणात एफआयआर दाखल झाला. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात. त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही, असे पडळकर यांनी म्हटले.
आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. जी कारवाई झाली आहे, त्याला कोर्टात आम्ही सामोरे जाऊ. तुम्ही सगळे व्हिडीओ बघा. मी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कोपऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांसोबत उभा होतो. तेव्हा नितीन देशमुख आमच्याजवळ आला, त्याची आणि माझी कोणतीही ओळख नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होतो. माझी लक्षवेधी असल्यामुळे मी दिवसभर सभागृहात होतो.
रात्री सभागृहात मंत्री नसल्यामुळे माझी लक्षवेधी रद्द करण्यात आली, त्यामुळे मी सभागृहाबाहेर आलो. आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे, आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही याविरोधात न्यायालयात लढाई देऊ, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. यावर पत्रकारांनी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अडवले का नाही, असा प्रश्न पडळकरांना विचारला. त्यावर पडळकर यांनी काही न बोलता, ‘नंतर या सगळ्या विषयावर बोलू’, असे सांगत काढता पाय घेतला.