
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत दिलेल्या वचनांचे पालन करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. असा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० एप्रिल रोजी जाहीर केल्याप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
या पार्श्वभूमीवर गावोगावी मराठा समाजाकडून मोर्चाची जय्य्त तयारी सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चासाठी मराठा समाजाकडून गावभेटी, बैठका व जनजागृती सुरू झाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० एप्रिल रोजी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपली आहे. महाराष्ट्र सरकार दिलेल्या वचनाचं पालन करण्यात अपयशी ठरलं आहे. असे जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला ‘चलो मुंबई’ असे आवाहन केले. याचं पार्श्वभूमीवर २९ ऑगस्ट रोजी मुंबईत सकल मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यात जोरदार तयारी चालू सुरू असून मराठा बांधव गावोगावी रॅलीचे आयोजन करत आहेत. तसेच बैठका घेऊन मराठा समाजातील लोकांची मोर्चाबाबत जनजागृती करत आहेत.
या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईला येण्याचं आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे. दरम्यान मोर्चाच्या काळात गणेश उत्सव असल्याने गणपतीची स्थापना चालत्या वाहनांमध्ये करून गणेशाचं विसर्जन समुद्रात करणार पण मोर्चाला येणार असल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते?
सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील ३० एप्रिल रोजी माध्यमांसमोर म्हणाले की, “मराठा समाजाने दोन वर्षांपासून धीराने वाट पाहिली आहे. आमच्या मागण्या मान्य करूनही, सरकारने कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी मुंबईत बेमुदत उपोषण होईल. या आंदोलनादरम्यान एकही व्यक्ती जखमी झाली तर मी महाराष्ट्रातील कोणताही आमदार किंवा खासदार मुक्तपणे बाहेर पडू शकणार नाही याची खात्री करेन.” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, जर सरकारने आता ऐकले नाही, तर आपण मुंबईला जाऊ. पण मला सर्वांनी मला तिथे सोडावे आणि त्यांच्या कामावर परतावे अशी माझी इच्छा आहे. सविस्तर रोडमॅप १ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल. तसेच जालना आणि मुंबईत एकाच वेळी निषेध करण्यात येईल.