
राहुल नार्वेकर कारवाईबाबत करणार मोठी घोषणा…
विधानभवनामध्ये गुरूवारी झालेल्या राड्यानंतर सर्वच सदस्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
त्यानंतर विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर उमटले.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृह सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून ते म्हणाले, काल झालेल्या प्रकारावर आपण आपल्या भावना मांडायला हव्यात. न्यायाची अपेक्षा आपल्याकडून नाही तर कुणाकडून करायची. या पवित्र सभागृहाच्या लॉबीमध्ये घडलेल्या घटनेमुळे देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाल्याची सगळीकडे चर्चा आहे.
आमदार प्रकाश सोळुंके यांनीही आज सभागृहात येताना मोकळा श्वास घेतल्याची भावना व्यक्त केली. अधिवेशन असेपर्यंत कुणालाही आतमध्ये प्रवेश देण्याची गरज नाही. आमदारांना धक्के खात यावे लागते, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. त्यावर नार्वेकरांनी मी मनावर घेण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मनावर घेतले तर अधिक परिणामकारक ठरेल, असे सांगितले.
सोळुंकेंनतर उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलण्यास उठले. मीही 35 वर्षे विधिमंडळात काम करतोय. मला जर कुणी काय सांगितलं तर मी सरळ सांगतो, हे काम होणार नाही. संपला विषय. तुम्ही पण तसं करा. तुम्हाला कुणी अडवलंय. तुमचा अधिकार आहे, असे सांगत अजितदादांनी अध्यक्षांना कडक भूमिका घेण्याबाबत सुचविले.
ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनीही आपण एवढे भिडस्त का होताय? असा प्रश्न करत मंत्र्यांचे अधिकृत पत्र असेल त्यांनाच आत घ्या, अशी विनंती केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. या विषयात काल बऱ्याचशा सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. पुढील कारवाई काय करणार आहे, याबाबत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहाला अवगत केले जाईल, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले. तसेच याबाबतच्या कारवाईविषयी दीड वाजता घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.