
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी हिंदी भाषक लोकांविरोधात हिंसाचार भडकावल्याचा आणि भाषेच्या आधारावर द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या याचिकेत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका आज वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून दाखल करण्यात आली.
राज ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला की, जर राज्यात पहिली ते पाचवीच्या वर्गात हिंदी भाषा सक्ती केली गेली तर ते शाळा बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. मीरारोडमधील सभेत भाषण करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला सतर्क राहण्याचे आणि हिंदी लादण्याचा कोणताही सरकारी डाव उधळून लावण्याचे आवाहन केले. यापूर्वी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमधील एका स्थानिक दुकानदाराला मारहाण केली होती. मनसे- शिवसेना ठाकरे गटासह इतर काही राजकीय पक्षांकडून हिंदी भाषा सक्तीला विरोध होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सक्तीचे आदेश मागे घेतले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी आग्रह धरला की, सरकार त्रिभाषा धोरण निश्चितपणे लागू करेल. पण हिंदी पहिलीपासून शिकवावी की पाचवीपासून… हे या विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे ठरवले जाईल. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांना हिंदी लादण्याचे आव्हान दिले. त्यानंतर काय परिणाम होतील याची देखील राज ठाकरे यांनी या सभेत सांगितले.
ते म्हणाले, ‘जेव्हा त्यांनी एकदा प्रयत्न केला तेव्हा आम्ही दुकाने बंद केली. आता जर हिंदी लादली गेली तर आम्ही शाळा बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही.’ राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. हिंदी लादून सरकार लोकांच्या प्रतिक्रियेची चाचणी घेत आहे कारण ते शेवटी मुंबईला गुजरातशी जोडू इच्छित आहे.’ यावेळी राज ठाकरे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू मुंबईत ये…मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे.’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रत्युत्तर दिले होते.