
अमेरिकेच्या कारवाईमुळे पाकिस्तान संतापला !
अमेरिकेने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. त्यानंतर पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की, आम्ही दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे.
अमेरिकेकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संबंध लष्कर-ए-तैयबाशी जोडण्याचा प्रयत्न खोटा आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानने काय म्हटले?
अमेरिकेने रेझिस्टन्स फ्रंटला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाकडून एक निवेदन आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानने संबंधित संघटनेचे नेटवर्क प्रभावीपणे नष्ट केले आहे. त्या संघटनेच्या सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खटले चालवले जात आहेत. त्यांच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सदस्यांना कट्टरपंथी विचारसरणीपासून मुक्त करण्यात आले आहे. या संघटनेच्या पाकिस्तानमध्ये बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेसोबत संबंध नाही, हे वास्तवाच्या विरुद्ध आहे.
टीआरएफवर कारवाईचा अमेरिकेचा निर्णय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंटला (टीआरएफ) जागतिक दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने शुक्रवारी घोषित केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे. दशतवाद संपवण्यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्य किती मजबूत आहे हे या निर्णयावरून दिसून येते.
जम्मू-काश्मीरमधील पहलेगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना टीआरएफचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करत ते नष्ट केले. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) टीआरएफ प्रमुख शेख सज्जाद गुलला हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून घोषित केले आहे.