
मनोज जरांगे पाटील सह बच्चू कडूंचा फोन…
लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं.
यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. या घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी फोन केल्याची माहिती विजय घाटगे यांनी दिली.
दरम्यान, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर घाटगे यांनी मनोज जरांगे पाटलांसह बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांचा फोन आला आहे. त्यामुळं अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी त्यांना नक्कीच भोवणार असल्याचं बोललं जात आहे. आरोग्याची तपासणी करतो. मग यातील लोकांच्या विरोधात तक्रारही देणार असल्याची माहिती विजय घाटगे यांनी दिली.
गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल
या घटनेवर मनोज जरांगे पाटील लक्ष ठेऊन आहेत. कारण राज्यातील शेतकऱ्याच्या पोरावर झालेला हल्ला आहे. कोणताही व्यक्तीगत द्वेष नव्हता, कोणतीही वैयक्तीक मागणी नव्हती. राज्याचा निष्क्रीय कृषीमंत्री बदला हे म्हणणं जर चुकीचं असेल तर अतिशय वाईट घटना आहे. मला बच्चू कडून, राजू शेट्टी मनोज जरांगे पाटील रविकांत तुपकर यांनी फोन केल्याचे विजय घाटगे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या पोरातला हा संताप आहे. राष्ट्रावादीची जी सत्तेची मस्ती आहे ती मस्ती शेतकऱ्यांची पोरं फतरवल्याशिवाय राहणार नाहीत असे विजय घाटगे म्हणाले. शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषीमंत्री भेटला आहे. त्याबाबात आम्ही बोलायचं नाही का? असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल असं आव्हान विजय घाटगे यांनी अजित पवार यांना दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.
सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना दिलं.निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा… असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.