
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते.
दोन्ही दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या रमी गेममुळे वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडून शिर्डी रोडवर MIDC परिसरात तब्बल अकरा एकरात भव्य फार्म आर्ट साकारण्यात आले आहे. कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात शेतात तब्बल4,42,900 स्क्वेअर फुटात तयार झालेलं हे देशातलं पहिलंच राजकीय फार्म आर्ट असल्याचं बोललं जातं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भला मोठा फोटो या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. ‘अन्नदाता हाच देशाचा भाग्यविधाता’ असा संदेश देत शेतकरी आणि ग्रामीण कलाकारांचा सन्मान करण्यासाठी हे खास फार्म आर्ट तयार करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर व क्षिप्रा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली 8 कलाकारांनी आणि 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने केवळ सहा दिवसांत 10 तास दररोज मेहनत घेऊन हे आर्ट उभं केले आहे. कोकाटेंनी दिलेल्या या अनोख्या गिफ्टची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खास शुभेच्छा…
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही अजित पवार यांना खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्चर चरणी प्रार्थना, असं शिंदेंनी म्हटलं आहे.