
भाजपा खालच्या तळावर जाऊन राजकारण करत आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात हनी ट्रॅपसारखे काहीही नाही. पण पोलीस रोज धाडी टाकत आहेत. गुप्तपणे धाडी पडत आहे. पोलीस गुप्तपणे काहीतरी शोधत आहेत.
मला वाटते पोलीस पेनड्राइव्ह का सीडी शोधत आहेत. प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा, मोठा मासा मंत्रिमंडळात आहे, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊतांनी आज मंगळवारी (ता. 22 जुलै) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हनी ट्रॅपबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी याबाबत स्पष्ट विधान केले आहे.
हनी ट्रॅप प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची ताकद 8 आमदारांचीच आहे. उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले आहे. हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राइव्ह दाखवून असतील. वेष बदलून अंधारात त्याचे प्रेझेंटेशन दिले असेल. त्यामुळे सरकार पाडण्यात आले. आमचे तर चार खासदार फक्त हनी ट्रॅप मुळेच गेले आहेत. मी जागा सांगू शकतो त्यांच्यासाठी कुठे ट्रॅप लावले होते. आम्ही त्यांना सावधही केले होते, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
तसेच, भाजपा खालच्या तळाला जाऊन राजकारण करत आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात हनी ट्रॅपसारखे काहीही नाही. पण पोलीस रोज धाडी टाकत आहेत. गुप्तपणे धाडी पडत आहे. पोलीस गुप्तपणे काहीतरी शोधत आहेत. मला वाटते पोलीस पेनड्राइव्ह का सीडी शोधत आहेत. प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा आहे, पण मोठा मासा मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे पोलिसांनी निःपक्षपणे तपास करायला हवा. महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाहीत. पोलीस पेन ड्राइव्ह आणि सीडी कुठे लपवली ते शोधण्यासाठी काम करत आहेत, त्यात काय आहे ते अनेकांना माहीत आहे. हे प्रकरण इतकं भयंकर आहे की या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून व्हायला हवा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
यावेळी खासदार संजय राऊत यांना मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत विचारणा करण्यात आली. यावर बोलताना ते म्हणाले की, प्रफुल्ल लोढा पेढा कोणाला भरवतोय, मिठी कुणाला मारतोय. तो कोणत्या पक्षात होता. तो जे सांगतोय ते काय सांगतोय ते पाहा, गिरीश महाजन यांच्यावर अशाप्रकारचे आरोप सतत होत आहेत. त्यांच्यावर मी आरोप करत नाही. पण गिरीश महाजन यांनी हे समजायला हवे की दुसऱ्यावर आरोप केल्यावर त्यांच्यावरचे डाग धुतले जात नाही. फडणवीसांचे संकटमोचक समजून घेणाऱ्यांचे कॅरेक्टर काय आहे, किती शुद्ध चारित्र्याचे लोकं आहेत हे दिसत आहे. कुंभला जाऊन तुम्ही डुबक्या मारल्या असतील म्हणून काय महाराष्ट्र शुद्ध झाला नाही. महाराष्ट्र अधिक गढूळ झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले.