
मारहाण झालेल्या विजय घाडगेंकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा !
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यानंतर निषेध म्हणून छावा संघटनेने मंत्री सुनील तटकरे यांच्यावर पत्ते उधळून निषेध व्यक्त केला.
या प्रकारानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेतकरी नेते विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली. सध्या घाडगे पुण्यातील केम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
अजित पवारांची भेट घेण्यासाठी त्यांनी पुणे जरी गाठले असले तरी, अद्याप त्यांची भेट झालेली नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना घाडगे यांनी सवाल उपस्थित करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय.
शेतकरी नेते विजयकुमार घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट आरोप केले आहेत, ‘अजित पवार यांच्या समर्थकांकडून माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. आम्ही शेतकरी पुत्र आहोत. आम्हाला आमचा स्वाभिमान आहे. पण जर शेतकरी मुले आवाज उठवली, तर त्यांना मारहाण केली जाते. त्यांचे नेते काहीही बोलत आहेत, आणि सरकार मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे’, असा घणाघात यावेळी त्यांनी केला.
त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं, ‘कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. काय भाषा वापरतात ते बघा. असा माणूस कृषीमंत्री म्हणून चालतो का? गृह मंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घालायला हवं’, असंही घाडगे म्हणाले.
‘सकाळी ११ वाजता अजित दादा भेटतील, असा निरोप आम्हाला मिळाला. पण नंतर काहीही झालं नाही. हा सगळा बनाव आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. गुन्हेगारांवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळे समोर होते. पण अद्याप कारवाई नाही. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार’, असा थेट इशारा यावेळी त्यांनी दिला.
‘मी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा माणूस आहे. याच्यावर दादा काय भूमिका मांडतात? हे पाहावे लागेल. अजित दादांकडून उत्तराची अपेक्षा आहे. कृषीमंत्री माणिक कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि हल्ल्याच्या कटाबाबत अजित पवारांनी उत्तर द्यावं’, अशी मागणी घाडगे यांनी केली.