
नाराज शिरसाटांना माधुरी मिसाळांनी दिलेल्या ‘त्या’ उत्तरामुळे चर्चांना उधाण…
राज्यातील महायुती सरकारमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याची नाराजी युतीतील वरिष्ठ नेत्यांनी उघड उघड व्यक्त केली आहे.
अशातच आता महायुतीमधील आणखी दोन मंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य रंगल्यामुळे युतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिदेंच्या शिवसेनेचे नेते, सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजप नेत्या तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात सामाजिक न्याय खात्याच्या बैठकांवरून नवा वाद सुरू झाला आहे.
माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या बैठकावर संजय शिरसाटांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर त्यांनी थेट उघडपणे नाराजीचे पत्र मिसाळ यांना पाठवून इथून पुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घ्या, असं ठणकावलं. तर त्यांच्या या पत्राला माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलं आहे.
बैठका घेण्याचा मलाही अधिकार आहे असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच बैठका घेतल्या असून सामाजिक खात्याची राज्यमंत्री असल्यानं बैठक घेण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज नाही, असं म्हणत माधुरी मिसाळ यांनी शिरसाटांना सुनावलं.
शिवाय यावेळी मिसाळ यांनी आपण बैठका घेऊन कोणतीही ढवळाढवळ केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी पत्रात लिहिलं की, ‘मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाही व निर्देश दिले नाहीत. राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकामध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही, अशी माझी धारणा आहे.
सदर बैठकात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. तो खात्याचे मंत्री म्हणून आपला अधिकार आहे. आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ केली नाही.’ दरम्यान, युतीतील नेत्यांच्या या वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, माधूरी मिसाळ या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अशी बैठक घेऊ शकत नाहीत. मी त्यांना चांगलं ओळखतो. शिवाय त्यांना बैठक घ्यायला सांगितली याचाच अर्थ संजय शिरसाट यांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे हेच संकेत आहेत, असं म्हणत आता शिरसाट यांच राजीनामा घेतला जाणार असल्याचा मोठा दावा राऊतांनी केला.